एका इंजेक्शनमुळे 'ऍक्टिव्हा'चे मायलेज वाढणार, होंडाचे नवे तंत्रज्ञान

मल्टी फ्युएल इंजेक्शन सिस्टिम इंधन वापरताना त्याचे प्रमाण नियंत्रित करत असते.

Updated: Dec 27, 2018, 11:16 AM IST
एका इंजेक्शनमुळे 'ऍक्टिव्हा'चे मायलेज वाढणार, होंडाचे नवे तंत्रज्ञान title=

नवी दिल्ली - दुचाकी निर्मिती क्षेत्रातील मोठी कंपनी होंडा लवकरच आपल्या गाड्यांचे मायलेज वाढविण्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरात आणणार आहे. यामुळे होंडा ऍक्टिव्हाचे मायलेज १० टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. सर्वाधिक विकली जाणारी ऍक्टिव्हा या कॅचलाईनसोबतच आता सर्वाधिक मायलेज देणारी बाईक यावर कंपनीने काम करण्यास सुरुवात केली आहे. 

इंधन इंजेक्शन तंत्रज्ञान
एका अहवालानुसार जपानमधील या दिग्गज कंपनीने ११० सीसी आणि १२५ सीसी या दोन्ही स्वरुपातील गाड्यांच्या मायलेज वाढविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या गाड्यांना बीएस६ निकषांनुसार तयार केले जाणार आहे. नव्या गाड्यांमध्ये इंधन इंजेक्शन तंत्रज्ञान वापरण्यात येईल. तंत्रज्ञानातील बदलामुळे १० टक्के मायलेज वाढविण्याकडे कंपनीने लक्ष दिले आहे. 

मल्टी फ्युएल इंजेक्शन सिस्टिम इंधन वापरताना त्याचे प्रमाण नियंत्रित करत असते. गाडीतील प्रत्येक सिलिंडरमध्ये इंधन प्रवाह करण्यासाठी अनेक इंजेक्टर लागलेले असतात. या तंत्रज्ञानाला ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते.

होंडा कंपनीने यावर्षी झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ऍक्टिव्हा ५ जी सादर केली होती. दोन व्हर्जनमध्ये ही गाडी बाजारात आणण्यात आली आहे. दिल्लीमध्ये गाडीची एक्स शोरुम किंमत ५२४६० इतकी आहे. तर डीएलएक्स व्हर्जनची किंमत ५४३२५ इतकी आहे. नव्या गाडीमध्ये एलईडी प्रकाशदिवा बसविण्यात आला आहे.