Dream Job : एखाद्या ठिकाणी जेव्हा एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळते तेव्हा त्या व्यक्तीचा आनंद गगनात मावेनासा होतो. अपेक्षित पगार, मनाजोगं पद आणि आवडीचं काम... आणखी काय हवं? असं म्हणत नोकरी करणारा एक वर्ग आणि दुसरा वर्ग म्हणजे पगारातच सारंकाही आलं... असं समजून नोकरीच्या ठिकाणी जीव ओतून काम करणारा. सध्या एका कंपनीमध्ये या दोन्ही वर्गातील कर्मचाऱ्यांचा अगणित नफा झाला आहे. इथं अगणित म्हणण्यामागचं कारण म्हणजे या कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनी ऐन तिशीतच नोकरी सोडण्याचाही निर्णय घेतला आहे. कारण, ठरतंय ते म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली गडगंज रक्कम.
Nvidia कंपनीला गेल्या काही वर्षांमध्ये चांगला नफा झाला असून, 2024 या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअरमध्ये 167 टक्क्यांनी वाढ झाली आहे.तर, गेल्या पाच वर्षांमध्ये शेअरचे दर तब्बल 3450 टक्क्यांनी वाढले. परिणामी पाच वर्षांपूर्वी किंवा त्यापेक्षा आधी ज्या कर्मचाऱ्यांनी या कंपनीत नोकरी स्वीकारली होती ते कर्मचारी सध्या कोट्यधीश झाले आहेत. कंपनीमध्ये मॅनेजर स्तरावर काम करणाऱ्या अनेकांनाच साधारण 8,22,90,000 रुपये म्हणजेच 1 मिलियन युएस डॉलर इतका तगडा नफा झाल्याची माहिती समोर येत आहे.
रंजक बाब म्हणजे सध्याच्या घडीला कंपनीचे सीईओ जेन्सन हुनाग यांचं लक्ष कंपनीतील कर्मचाऱ्यांनी वेधलं असून, एनविडियाच्या एक्झिक्युटीव्हपदी असणाऱ्या काही कर्मचाऱ्य़ांनी तर, जवळपास निवृत्ती घेतल्यामुळं ही बाब अनेकांच्या भुवया उंचावत आहे. सध्याच्या घडीला या कर्मचाऱ्यांना लाभलेलं आर्थिक स्थैर्य पाहता त्यांच्यापैकी अनेकांनीच कामातून स्वत:ची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. थोडक्यात पाच वर्षांत कोट्यधीश होऊन निवृत्त झाले 'या' कंपनीचे कर्मचारी!
ग्राफिक कार्ड आणि कंप्यूटर टेकसाठी ओळखल्या जाणाऱ्या एनविडीया कंपनीनं जगातील सर्वोत्तम कंपनीच्या रुपात एक नवी ओळख प्रस्थापित करत मायक्रोसॉफ्टलाही मागे टाकलं आहे. ही कंपनी ग्राफिक्स प्रोसेसिंग यूनिट (जीपीयू) च्या डिझायनिंगसाठी ओळखली जाते. 1993 मध्ये या कंपनीची सुरुवात जेन्सेन हुआंग, कार्टिस प्रीम आणि क्रिस मालाचोव्स्की यांनी केली होती. कॅलिफोर्नियातील सँटा क्लोरा इथं स्थित या कंपनीचं ग्रफिक कार्ड व्हिडीओ गेम मार्केटमध्ये बरंच प्रसिद्ध आहे.