नवी दिल्ली : कार चालवताना आता ट्रॅफिकचं टेन्शन घेऊ नका... कारण आता बाजारात एअर कार आलीय. की कार जमिनीवर धावतेच शिवाय आकाशात उडते. अमेरिकेत या कारची धडाक्यात बुकिंग सुरू आहे. हवेत उडणारी आपली स्वतःची कार असावी असं स्वप्न माणसानं पाहिलं होतं. हे स्वप्न आता पूर्ण झालंय. कारण हवेत उडणारी कार प्रत्यक्ष अस्तित्वात आलीय. तसं पाहिलं तर हवेत उडणाऱ्या टॅक्सीचे सध्या प्रयोग सुरु आहेत. हे प्रयोग सुरु असतानाच एका हॉलंडच्या कंपनीनं चक्क उडणारी कार विकण्यास सुरुवात केलीय.
'पर्सनल एअर ऍन्ड लँड व्हेईकल' (Personal Air and Land Vehicle किंवा PAL-V) असं या उडणाऱ्या कारचं नाव आहे. अमेरिकेतल्या मियामी इथं या कारची बुकिंग सुरू झालीय.
ही कार हेलिकॉप्टरसारखी हवेत टेक ऑफ घेते. ताशी २०० किलोमीटर एवढा या कारचा वेग आहे. हवेत १२ हजार ५०० फुटांची उंची ही कार गाठू शकते.
जमिनीवर धावताना हिचा कमाल वेग ताशी शंभर किलोमीटर प्रतितास एवढा आहे. रस्त्यावर कार चालवून तुम्ही थकला असाल तर तुम्हाला हवेत कार चालवण्याचा अनुभव घेण्यासाठी अवघी दहा मिनिटं लागतात. १० मिनिटात ही कार टेक ऑफ घेण्यासाठी सज्ज असते.
जेव्हा की कार रस्त्यावर धावते तेव्हा कारमध्ये तीन प्रवासी बसण्याची सोय असते. पण जेव्हा ती हवेत उडण्यासाठी सज्ज होते तेव्हा तिच्यात ड्रायव्हरसह दोनच प्रवासी बसू शकतात. आत्तापर्यंत तब्बल ७० जणांनी या कारसाठी बुकिंग केलीय.
ही कार म्हणजे वाहतूक कोंडींवर रामबाण उपाय ठरणार आहे. वाहतूक कोंडीतून ही कार तातडीनं टेक ऑफसाठी सज्ज राहणार आहे.
आता एवढी 'ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी' म्हटल्यावर तिची किंमतही तशीच राहणार आहे. या कारची किंमत ४ कोटी ३० लाख रुपये असणार आहे. आता कार हवेत उडणार म्हटल्यावर तिची किंमत तशी असणार ना!
भारतात महागड्या कार खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळं लवकरच भारतातही अशी कार दिसली तर आश्चर्य वाटून देऊ नका...