Elon Musk News in Marathi: तुम्ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा 'रोबोट' हा चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटामध्ये मानवाने तयार केलेले रोबोट कशाप्रकारे संपूर्ण कारभार हातात घेऊ पाहतात आणि त्यावर त्यांना निर्माण करणारा रजनिकांत कशी मात करतो अशी कथा दाखवण्यात आली आहे. मात्र रोबोटने खरोखर एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना फारच क्वचित घडते. पण खरोखरच असा प्रकार घडला आहे. हा धक्कादायक प्रकार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क मालक असलेल्या 'टेस्ला' कंपनीमध्ये. यावर एलॉन मस्क यांनी प्रतिक्रियाही नोंदवली आहे.
सध्या जगभरातील अनेक अशी क्षेत्रं आहेत जिथे रोबोटच लोकांचं काम पाहतात. अगदी आरोग्यविषय क्षेत्र असो किंवा इतर क्षेत्र असो रोबोटचा वापर दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. रोबोट आता हळूहळू दैनंदिन जीवनाचा भाग होत आहेत. मात्र हेच रोबोट धोकादायक ठरु शकतात याची झलक दाखवणारी घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. ही घटना सध्या पुन्हा चर्चेत आहे. 2021 मध्ये टेस्ला कंपनीच्या गीगा टेक्सास येथील कारखान्यामध्ये एका कर्मचाऱ्यावर रोबोटने हल्ला केला होता. एका सहकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे या कर्मचाऱ्याचा जीव वाचवला होता.
2 वर्षांपासून ही गोष्ट टेस्ला कंपनीने समोर येऊ दिली नाही. या घटनेची कुठे चर्चाही झाली नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी भविष्यातील धोक्याबद्दल दिलेला इशारा या घटनेमुळे अधोरेखित झाला होता. रोबोट मानवाच्या जीवाला धोका पोहचवू शकतो हेच या मधून समोर आलं. मात्र एलॉन मस्क यांनी असं काही घडलं नाही म्हणत हे वृत्त फेटाळणारं एक निवेदन जारी केलं आहे.
'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तानुसार, टेस्ला कंपनीच्या टेक्सासमधील ऑस्टिन येथील कारखान्यामध्ये एक इंजिनिअर काम करत होता. त्याचवेळी एका रोबोटने या इंजनिअरवर हल्ला केला. या रोबोटने कर्मचाऱ्याला जमीनीवर आपटलं. त्यानंतर त्याने या कर्मचाऱ्याची पाठ पकडून ठेवली. तेथे उपस्थित असलेल्या सहकाऱ्याने तातडीने आपत्कालीन बटन दाबलं आणि त्यामुळे रोबोटची पकड सैल झाल्याने कर्मचाऱ्याचा जीव वाचला.
या घटनेची माहिती ट्रेविस काउंटी आणि हेल्थ डिपार्टमेंटला देण्यात आली होती. या अहवालाची एक प्रत सध्या समोर आली आहे. रोबोटच्या हल्ल्यापासून वाचल्यानंतर कर्मचारी वर्क स्टेशनमधून पळत बाहेर आला होता. त्याच्या शरीरामधून रक्ताची धार वाहत होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या शरीरावर एखाद्या धारधार वस्तूने हल्ला केल्यासारखे व्रण होते.
मस्क यांनी एक्सवरुन (ट्विटरवरुन) "2 वर्षांपूर्वी घडलेल्या एका साधारण इंडस्ट्रियल कूका प्रकारच्या रोबोटसंदर्भातील घटनेला वाढवून सांगितलं जात आहे. प्रसारमाध्यमांना लाज वाटली पाहिजे. ज्या पद्धतीने रोबोटला प्रोग्राम करण्यात आलं आहे तेच काम त्याने केला. रोबोट बंद आहे असं इंजिनिअरला वाटलं असेल पण असं नव्हतं," अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. मस्क यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.