सोलापूर : हवामान आणि ऋतूबदलानुसार आपल्या आहारात बदल करतो. तसेच ऋतूनुसार आपला पेहराव बदलतो. उन्हाळ्यात सुती तर हिवाळ्यात दमट कपडे परिधान करतो. महाराष्ट्रात सर्वत्र गुलाबी थंडी पसरली आहे. वातावरणात गारवा जाणवायला लागलाय. लोकांनी कपाटातून स्वेटर, मफलर आणि कानटोप्या काढायला सुरुवात केली आहे. वाढत्या थंडीपासून प्रत्येक जण आपला सांभाळ करतोय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठुरायाला सुद्धा थंडीपासून बचाव करण्यासाठी विशेष पोशाख केला जातोय.
प्रक्षालपुजा आटोपल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून हा ऊबदार पोशाख विठुरायाला परिधान करायला सुरुवात केली जाते. या पोशाखात प्रामुख्याने मुंडासे, रजई आणि मफलरचा समावेश असतो.रात्रीची आरती आटोपल्यानंतर विठुरायाच्या झोपायच्या वेळेआधी संपूर्ण शरीर पुसलं जातं. डोक्यावर असलेला मुकुट काढून त्याजागी ऊबदार मुंडासे बांधला जाते. थंड वारा कानाला लागू नये यासाठी मफलर बांधला जातो. अंगावर रजई टाकली जाते.
हा पेहराव करण्याची सुरुवात प्रक्षालपुजेच्या दुसऱ्या दिवसापासून केली जाते. तर हिवाळा संपेपर्यंत हा पोशाख दररोज केला जातो.