कोल्हापूर: ऱाजू शेट्टींनी पुकारलेल्या दूध आंदोलनामागचे कारण योग्य आहे. मात्र, या आंदोलनाची पद्धत चुकता कामा नये, असे मत जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात दुधाचे दर प्रति लीटर १४ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, हे वास्तव आहे. त्यामुळे शेट्टींनी घेतलेला पवित्रा गैर नाही. परंतु, हा मुद्दा मांडत असताना त्याची पद्धत चुकायला नको, असे कोरे यांनी म्हटले.
तसेच सरकारने दूध दर वाढीवरुन सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेवून तात्काळ अंदोलकाशी चर्चा करावी. सरकार तयार असल्यास राजू शेट्टी यांनीही चर्चेचा तयारी दाखवावी, असे आवाहनही यावेळी कोरेंनी केले.
तत्पूर्वी आज राजू शेट्टी यांनी सरकारने चर्चेचे निमंत्रण दिल्याचे वृत्त फेटाळून लावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. दूध दरवाढीच्या मुद्द्यावर चर्चेला तयार आहोत. पण, ज्यांना ही चर्चा करण्याचे अधिकार आहेत अशांसोबतच चर्चा केली जाईल. या चर्चेत अधिकार नसलेल्या लुंग्यासुंग्यांची लूडबूड नको, असेही शेट्टी यांनी सांगितले.