पुणे: प्रसिद्ध तेलगू कवी वरवरा राव यांना २६ नो्व्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाने राव यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुणे पोलिसांनी राव य़ांना शनिवारी रात्री तेलंगणा येथील घरातून ताब्यात घेतले.
नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील दंगलीस कारणीभूत ठरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. प्रसिद्ध तेलगु कवी वरवरा राव यांनी सरकारविरोधात युद्ध पुकारलंय. त्यांचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग आहे असा दावा सरकारी वकिलांनी पुणे न्यायालयात केला.
राव यांचे काश्मिरी फुटीरतावाद्यांशी असलेले संबंध तपासायचे आहेत. याशिवाय त्यांनी शस्त्र खरेदी कुठून केली, त्यासाठी पैसा कुणी पुरवला यासह विविध गोष्टींचा तपास करायचा आहे, असे पुणे पोलिसांनी न्यायालयात म्हटले.
राव यांना अटकेबाबत असलेली संरक्षणाची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राव यांच्याबरोबर अटक करण्यात आलेले अरुण परेरा, व्हर्णन गोन्सालवीस आणि सुधा भारद्वाज हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, गौतम नवलखा हे नजरकैदेत आहेत.