उत्तर प्रदेश: सर्वसामान्य मुलीने बनवली 'बलात्कार फ्री अंडरवेअर'

मुलींनी ही अंडरवेअर घातल्यावर होणार नाही बलात्कार 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 30, 2017, 02:04 PM IST
उत्तर प्रदेश: सर्वसामान्य मुलीने बनवली 'बलात्कार फ्री अंडरवेअर' title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एका सर्वसामान्य कुटुंबातील 19 वर्षीय मुलीने एक अंडरवेअर बनवली आहे. खास मुलींसाठी असलेली ही अंडरवेअर बलात्कारासारख्या संभाव्य धोक्यापासून मुक्ती देऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.

'रेप प्रूफ पॅन्ट'

सीनू कुमारी असे ही अंडरवेअर तयार करणाऱ्या मुलीचे नाव आहे. सीनू ही उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे. प्राप्त माहितीनुसार सीनूने एक अशी अंडरवेअर तयार केली आहे की, ही अंडरवेअर वापरणे अनेक मुली आणि महिलांसाठी सुरक्षीत ठरू शकते. कारण, या अंडरवेअर मध्ये एक अशा पद्धतीचे लॉक वपरण्यात आले आहे ज्याद्वारे बलात्काराला आळा बसू शकतो. या अंडरवेअरला सीनू 'रेप प्रूफ पॅन्ट' असे संबोधते.

मनेका गांधींनीही दिली शाबासकी

ही अंडरवेअर बनविण्यासाठी 'ब्रेड प्रूफ' कपड्यांचा वापर करण्यात आला असून, त्यात एक स्मार्ट लॉकही असणार आहे. तसेच, ही अंडरवेअर जीपीआरएस आणि एका रेकॉर्डरनेही युक्त असणार आहे. सीनूने म्हटले आहे की, आपण अशा प्रकारे अंडरवेअरची निर्मिती केल्याबद्दल केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनीही आपल्याला शाबासकी दिली आहे.  

पोलिसांना कळणार तत्काळ माहिती

दरम्यान, सीनू कुमारीच्या हवाल्याने बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ही अंडरवेअर सहज काढली किंवा कापली जाऊ शकत नाही. तसेच, जाळलीही जाऊ शकत नाही. कारण, या अंडरवेअरमध्ये एक लॉक लावण्यात आले आहे. जे केवळ पासवर्ड टाकल्यावरच उघडू शकते. सीनू पुढे सांगते की, या अंडरवेअरमध्ये एक बटनही लावण्यात आले आहे. जे दाबताच 100 क्रमांक डायल होऊ शकतो. ज्यामुळे पोलिसांना घटनेची माहिती कळू शकेल. तसेच, जीपीआरएसच्या मदतीने पोलिसांना घटनास्थळही शोधून काढता येऊ शकेल. इतकेच नव्हे तर, घटनास्थळापर्यंत पोहोचेपर्यंत पोलिसांना अंडरविअरमधील रेकॉर्डरमुळे आवाजही टीपाता येऊ शकणार आहे. 

केवळ 4 हजारांत अंडरवेअर तयार

विशेष असे की,  इमरजन्सी स्थितीमध्ये पहिला कॉल कुणाला जावा याचेही तुम्हाला सेटींग करता येऊ शकते. मात्र, 100 आणि 1090 हे क्रमांक सुरक्षेसाठीच असल्यामुळे आणि जवळच्या पोलिस स्थानकाला माहिती कळावी यासाठी हे क्रमांक इनबिल्ड आहेत, असेही सोनू सांगते. ही अंडरवेअर बनविण्यासाठी सुमारे 4 हजार रूपये इतका खर्च आल्याचे सीनू सांगते.