मुंबई : एखाद्या व्यक्तीला 2 वेळा कोरोनाची लागण झाल्याचं तुम्ही ऐकलं असेलच...मात्र एका व्यक्तीला 43 वेळा कोरोनाची लागण झाल्याचं कानावर आलंय का? नक्कीच तुम्ही याबाबत ऐकलं नसेल. यूकेमध्ये कोरोनाचं एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्याची सगळीकडे सध्या चर्चा सुरू आहे. इंग्लंडच्या ब्रिस्टलमध्ये राहणारा एक 72 वर्षीय व्यक्ती 43 वेळा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे.
डेव्ह स्मिथ असं या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, ही व्यक्ती सतत 10 महिने कोविड पॉझिटिव्ह राहिली आहे. इतक्या वेळा एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा केला जातोय. डेव्ह स्मिथ यांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना सात वेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना स्मिथ म्हणाले, "माझ्या शरीरातील शक्ती पूर्णपणे कमी झाली होती. एका रात्रीत मी सतत 5 तास खोकत होतो. मी जगण्याच्या माझ्या सर्व आशा सोडून दिल्या होत्या. मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बोलवलं, प्रत्येकाशी शांतपणे बोललो आणि त्यांना गुडबाय सांगितलं."
आजारपणात स्मिथचं वजन 63 किलोंनी कमी झालं. स्मिथ यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं की, “आज रात्री माझं निधन झालं तर घाबरू नकोस. जेव्हा मी झोपायला जायचो तेव्हा मला असं वाटायचं की, झोपेत असताना शांततेच माझा मृत्यू व्हावा."
स्मिथवर अँटी-व्हायरल औषधांच्या मिश्रणाने उपचार केले गेले. या उपचारांना दोन आठवड्यांचा कालावधी लागला. त्यानंतर त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला. कोरोना निगेटीव्ह आल्याचं तेव्हा तो त्याच्या कानांवर विश्वासच बसला नाही.
ब्रिस्टल विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आता स्मिथच्या या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत. कोरोनाव्हायरस शरीरात कुठे होता आणि तो आत कसा बदलला हे शास्त्रज्ञ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.