नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस (Jeff Bezos) पत्नी मॅकेन्झी बेजोस हिच्यापासून घटस्फोट घेत आहेत. बेजोस यांनी बुधवारी ट्विट करून हे स्पष्ट केलंय. जेफ आणि मॅकेन्झी २५ वर्षांपूर्वी एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकले होते. हे दोघे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांपासून वेगळे राहत होते.
'आमचं कुटुंब आणि मित्र परिवाराला माहीतच आहे की दीर्घकाळ सोबत राहिल्यानंतर आणि घटस्फोटाच्या प्रक्रियेनंतर आम्ही परस्पर संमतीनं एकमेकांनापासून विलग होण्याचा निर्णय घेतलाय. भविष्यात आम्ही दोघेही मित्रांप्रमाणे राहू... आम्ही एक दाम्पत्य म्हणून एकमेकांसोबत खूप चांगला वेळ व्यतीत केला' असं बेजोस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
— Jeff Bezos (@JeffBezos) January 9, 2019
जेफ आणि मॅकेन्झी यांची बेट डीई शॉ मध्ये झाली होती. त्यांची ही भेट अमेझॉनच्या स्थापनेपूर्वी झाली होती. मॅकेन्झी बेजोस अमेझॉनच्या पहिल्या कर्मचारी होत्या. जेफ बेजोस यांनी १९९४ साली अमेझॉनची स्थापना केली होती. 'ब्लूमबर्ग'नं दिलेल्या माहितीनुसार, बेजोस १३७ अरब डॉलरच्या संपत्तीचे मालक आहेत.
मॅकेन्झी या लेखिका आहेत. त्यांनी 'द टेस्टिंग ऑफ ल्युथर अलब्राईट' आणि 'ट्रॅप्स' अशा अनेक कादंबऱ्यांचं लेखन केलंय. त्यांचे शालेय शिक्षण सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झालंय.
मॅकेन्झी या 'प्रिन्सटन युनिव्हर्सिटी'त नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी गेल्या असताना त्यांची भेट जेफ यांच्याशी झाली होती. या जोडप्याला चार मुलं आहेत. गेल्या वर्षी बर्लिनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात 'तुमच्याकडे प्रेम आणि मदत करणारी मॅकेन्झी, आई-वडील आणि आजी-आजोबांसारखे लोक असतील तर कोणताही धोका तुम्ही पत्करू शकता' असं म्हणत जेफ यांनी आपल्या पत्नीवर कौतुकाची उधळण केली होती. या दोघांचं विवाहानंतर २५ वर्षांनी वेगळं होणं त्यांच्या नातेवाईकांसहीत अनेकांसाठी आश्चर्याची बातमी ठरलीय.