video : बराक ओबामांचा नागरिकांना अनपेक्षित फोन आला आणि...

अवघ्या आठ महिन्यांच्या बाळाशी ओबामा संवाद साधतात तेव्हा   

Updated: Nov 3, 2020, 02:55 PM IST
video : बराक ओबामांचा नागरिकांना अनपेक्षित फोन आला आणि...  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : America अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी होणारा प्रचार साऱ्या जगाचं लक्ष वेधून जात होता. या प्रचारामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोघांनीही विविध प्रकारे प्रचारसभा घेत नागरिकांना आपल्याला मत देण्याचं आवाहन केलं. मुख्य म्हणजे या रणधुमाळीत सर्वांचं लक्ष माजी राष्ट्राध्यक बराक ओबामा नेमकं काय करतात याकडेही होतं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाचं अतिशय समर्पक उत्तर मिळत आहे. 

खुद्द बराक ओबामांचा फोन आल्यामुळं एका महिलेला अनपेक्षितपणे आश्चर्याचा धक्काच बसल्याचं पाहायला मिळालं. किंबहुना तिच्या आवाजातूनच याचा अंदाजही आला. ओबामांनी फक्त या महिलेशी संवाद साधत त्यांना या निवडणुकीमध्ये बायडेन यांना मत देण्याचीच विनंती केली नाही, तर तिच्या आठ महिन्याच्या बाळाचा आवाज ऐकत त्याच्याशीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. 

कोरोना व्हायरसचं coronavirus संकट पाहता जनतेशी फोनच्या माध्यमातून संवाद साधत बायडेन यांच्यासाठी मत मागण्याचा मार्ग ओबामा यांनी आपलासा केला. ऍलिसा नावाच्या एका महिलेला फोन केल्यानंतर तिच्याशी साधलेल्या संवादाचा एक व्हिडिओ खुद्द ओबामा यांनीच ट्विटवर शेअर केला. 

 

ओबामा यांचा आवाज ऐकताच आणि इतक्या मोठ्या व्यक्तीनं आपली ओळख सांगताच फोनच्या त्या पलीकडे असणाऱ्या महिलेला प्रथमत: यावर विश्वासच बसला नाही. पण, खुद्द माजी राष्ट्रपतींशी संवाद साधण्याची संधी आपल्याला मिळाल्याचा आनंदही तिला लपवता आला नाही. तेव्हा आता अमेरिकेच्या राजकारणात नवं वळण नेमकं कोणत्या रुपात येणार याकडेच साऱ्यांच्या नजरा असणार आहेत असं म्हणायला हरकत नाही.