अहमदाबाद : अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज भारतात आले. अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. मोदींनी आपल्या मित्राचं स्वागत अर्थातच मोदी स्टाईल मिठी मारुन केलं. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांचं वाजतगाजत स्वागत केलं. ट्रम्प यांची पहिली भेट होती ती साबरमती आश्रमाला. ट्रम्प यांनी गांधीजींचा आश्रम पाहिला, अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलानिया यांनी सूतकताईही केली. गांधीजींच्या वस्तू पाहिल्या. पण गंमत म्हणजे बाहेर आल्यावर व्हिजिटर बुकमध्ये ट्रम्प यांनी गांधीजींबद्दल नव्हे तर मोदींबद्दल लिहिलं.
ट्रम्प यांनी लिहिलं की, टू माय ग्रेट फ्रेंड प्राईम मिनिस्टर मोदी थँक्यू फॉर धिस वंडरफुल व्हिजीट. विमानतळ ते मोटेरा स्टेडियममधल्या कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प यांची सहा वेळा गळाभेट झाली.
ज्या भाषणाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. त्या भाषणाची सुरुवातच ट्रम्प यांनी केली ती पंतप्रधान मोदींच्या कौतुकानं आणि त्यांना माय 'ट्रू फ्रेंड' म्हणतच...
मनापासून मेहनत केली तर तुम्ही सर्वोच्च उंचीवर पोहोचू शकता, हे मोदींनी दाखवून दिल्याचं सांगताना ट्रम्प यांनी मोदी लहानपणी चहा विकायचे याची आठवण करुन दिली.
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची पहिल्यापासूनच केमिस्ट्री एकदम भारी राहिली आहे. मग तो हाऊडी मोदी कार्यक्रम असो... किंवा नमस्ते ट्रम्प... किंवा अगदी फ्रान्समधल्या भेटीत दोघांचे एकमेकांना टाळ्या देऊन केलेले विनोद असो. दोघेही एकमेकांचे 'ट्रू फ्रेंड आहेत', हे सांगण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.