पेईचिंग : 'गरीबी हटाव'चा नारा जगभरातील अनेक देशांनी यापूर्वी दिला आहे. आजही अनेक देश गरीबी हटावसाठी प्रयत्न करत आहेत. पण, चीन या सर्व देशांपेक्षा काहीसा वेगळाच ठरला आहे. देशातील गरीबी हटविण्यासाठी चीनेने चक्क ९८ लाख लोकांचे स्थलांतर करण्याचा घाट घातला आहे. चीनचा हा प्रयोग किती यशस्वी होईल हे येणारा काळच सांगेन. मात्र, तूर्तास तरी, चीनची ही मोहीम जगभरातून कुतूहलाचा विषय ठरली आहे.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग हे आपला ५ वर्षांचा कार्यकाळ दुसऱ्यांदा पूर्ण करत आहेत. दुसऱ्या कार्यकाळात चीनमधील गरीबी हटवणे हे त्यांचे एकमेव लक्ष राहणार आहे. यासाठी चीनने प्रत्यक्षात कामलाही सुरूवात केली असून, त्यासाठी चीनी प्रशासनाचे शेकडो अधिकारी कामाला लागले आहेत. 2020 पर्यंत देशातील गरीबी दूर करण्याचे चीनचे ध्येय आहे. राष्ट्रपती जीनपींग यांची ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजना असाही या मोहिमेचा उल्लेख केला जात आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, जीनपींग यांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सरकार ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना सरकारी अनुदानातून तयार करण्यात आलेल्या घरांमध्ये स्थलांतरकरण्यात येणार आहे.
२०१६ ते २०२० दरम्यान चीनने २२ प्रॉविन्स ते कमीत कमी ९८.१० लाख लोकांना त्यांच्या घरातून स्थलांतर केले आहे. काही लोकांना या मोहिमेअंतर्गत ग्रामिण भागातून शहरी भागात स्थलांतरित करण्यात येणार आहे. तर, काही लोकंना ग्रामिण भागातून ग्रामिण भागातच वसविण्यात येईल. चीनला विश्वास वाटतो आहे की, २०२० पर्यंत ते आपल्या ३ कोटी लोकांना दारिद्र्यरेशेखालून वरच्या स्तरावर आणून ठेवतील.
१९८०नंतर आर्थिक विकासाचा टप्पा प्रचंड वेगाने गाठत बहुतांश भागातील गरिबी चीनने संपवली आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्राने नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये चीनची कमीत कमी ५.७ टक्के ग्रामिण जनता दारिद्र्यरेशेखालचेच जीवन जगत आहे. चीनच्या पश्चिम भागातील हाच आकडा १० टक्क्यावरही पोहोचतो.
गेल्यावर्षी चीनने देशातील सर्वात गरीब म्हणून ओळखला जाणाऱ्या क्वाईचो प्रांतातून सुमारे साडेसाथ लाखांहून अधिक लोकांना तब्बल ३६०० ठिकाणांवर स्थलांतरीत केले आहे. याच पद्धतीने गांसू, सछ्वान आणि ग्वांग्वासी प्रांतातूनही १० लाख लोकांना स्थलांतरीत करण्याची तयारी चीनने केली आहे. एकट्या युवान प्रांतातूनच ६ लाख ७७ हजार लोकांना २८०० नव्या गावात स्थलांतरीत करण्याची तयारी केली जात आहे.