Covid 19 : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चीनमध्ये थैमान माजलं आहे. देशाच्या अनेक शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून सक्तीचं लॉकडाऊन (Lockdown in China) करण्यात आलं आहे. देशातल्या तब्बल 2 कोटी 60 लाख लोकांची खाण्यापिण्यासाठी आबाळ सुरू आहे. लोकांना घराबाहेर पडणं कठीण होऊन बसलं आहे. त्यामुळे चिनी जनतेचा पुन्हा एकदा जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला.
चीन सरकार सापडलं दुहेरी संकटात
आरोग्यविषयक सुविधांबाबत डंका वाजवणा-या चीनमध्ये पुन्हा एकदा आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. चीनमधील सर्वाधिक लोकसंख्येचं शहर अशी ओळख असलेल्या शांघायमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनामुळे प्रशासनानं इथं लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे तब्बल 2 कोटी 60 लाख लोकांना घरामध्ये कैद व्हावं लागलं आहे. इथली सगळी सुपरमार्केट्स बंद आहेत. त्यामुळे लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी झगडावं लागलंय. या लॉकडाऊनमुळे चीनच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली गेली आहेत. लोकांपर्यंत जिवनावश्यक वस्तू पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरल्यानं प्रचंड रोष व्यक्त होतो आहे.
चीनच्या शांघाय शहरात दररोज 15 ते 20 हजार कोरोना रूग्ण आढळून येत आहेत. कोरानाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार इतरत्र होऊ नये यासाठी चीनमध्ये झिरो कोव्हिड पॉलिसी राबवण्यात येते आहे. तसंच जोपर्यंत शहरातील सर्व लोकांच्या सँपल्सची तपासणी होत नाही तोपर्यंत निर्बंध कायम राहतील अशी घोषणा प्रशासनानं केली आहे.
शांघायसह चीनच्या पाच शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र इथं लोकांचा अंत होतोय की काय अशी स्थिती आहे. याआधीही सक्तीच्या लॉकडाऊनविरोधात चिनी लोकांनी निदर्शनं करत निषेध व्यक्त केला होता. आता भूकेनं लोकांचा जीव कासावीस झालाय. त्यामुळे कोरोनाला रोखायचं की निर्बंध शिथील करायचे अशा दुहेरी संकटात चीन सापडलं आहे.