नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. चीनची राजधानी बीजिंगमध्ये इमरान खान यांनी एक भाषणही दिलं. या भाषणाचं थेट प्रसारण 'पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशन' अर्थात पीटीव्हीनं देशभर केलं. पण, या दरम्यान या चॅनलनं मोठी चूक केली... ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली.
पीटीव्हीनं पंतप्रधान इमरान खान चीनच्या दौऱ्यावर असताना भाषणाच्या प्रसारणा दरम्यान स्क्रीनवर चीनची राजधानी 'बीजिंग'ऐवजी इंग्रजीत 'बेगिंग' असं लिहिलं. 'बेगिंग' या इंग्रजी शब्दाचा मराठीत अर्थ होतो 'भीक मागणं'...
आपली चूक लक्षात आल्यानंतर पीटीव्हीनं माफी मागितलीय... पण, सोशल मीडियावर मात्र यावर अनेक कमेंटस् पाहायला मिळतायत.
सध्या वाईट आर्थिक परिस्थितीतून जाणाऱ्या पाकिस्तानसाठी आर्थिक पॅकेज सुनिश्चित करण्यासाठीच इमरान खान चीनच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी बीजिंग स्थित सेंट्रल पार्टी स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते, जेव्हा हा घोटाळा झाला.
'झालेल्या प्रकाराबद्दल आम्हाला खेद आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल' असं ट्विट पीटीव्हीच्या अधिकृत हॅन्डलवरून करण्यात आलंय.