अणुयुद्ध झाल्यास जगात हाहाकार, 30 मिनिटांत जाणार 10 कोटी लोकांचा बळी

रशिया-युक्रेन युद्ध अण्विक युद्धाच्या दिशेनं गेलं तर जगाचा विनाश अटळ

Updated: Mar 2, 2022, 08:36 PM IST
अणुयुद्ध झाल्यास जगात हाहाकार, 30 मिनिटांत जाणार 10 कोटी लोकांचा बळी  title=

Russia Ukrain War : रशियानं युक्रेनवर बॉम्ब आणि मिसाईलचा वर्षाव सुरु केला आहे. तर युक्रेननंही रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र आता जगाला एका वेगळ्याच चिंतेनं ग्रासलंय. ही भीती आहे अणुयुद्धाची. रशिया-युक्रेन युद्धात अणुयुद्धाचा वापर होऊ शकतो अशी शक्यता स्विर्त्झलँडमधील ICAN या संस्थेनं वर्तवली आहे. 

2017 मध्ये या संस्थेनं शांततेचा नोबेल पुरस्कारही पटकावलाय. अणुबॉम्बचा हल्ला झाला तर जगाला फार मोठी किंमत मोजावी लागेल असं या संस्थेनं आपल्या अहवालात म्हंटलंय. 

अणुयुद्ध झाल्यास काय होईल ? 
ICAN च्या अभ्यासानुसार रशिया-युक्रेन युद्धात अणुबॉम्बचा वापर झाल्यास अवघ्या अर्ध्या तासात 10 कोटी लोकं मृत्यूमुखी पडतील. सध्या जगात असलेल्या अण्वस्त्रांपैकी एक टक्क्यांहून कमी अण्वस्त्रांचा वापर केला तर जवळपास दोन अब्ज नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागेल. 

त्याशिवाय आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर ताण येईल. मुंबईसारख्या शहरात जिथं प्रत्येक किलोमीटरच्या परिघात 1 लाखांहून अधिक लोकं राहतात तिथं हिरोशिमासारखा अणुबॉम्ब टाकल्यास एका आठवड्यात 8 लाख 70 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होईल. याशिवाय पृथ्वीचं तापमान प्रचंड वाढेल. हवामानात बदल झाल्यानं माणसांचं आरोग्य धोक्यात येईल. शेतीचंही प्रचंड नुकसान होईल. 

1945 साली अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले त्याचे परिणाम आजही जपान भोगतोय. अणुबॉम्बनं जपानच्या कित्येक पिढ्यांचं नुकसान झालं. तिथल्या मातीत गवतही उगवत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे हे युद्ध अण्विक युद्धाच्या दिशेनं गेलं तर जगाचा विनाश अटळ आहे.