संयुक्त राष्ट्र : येत्या आठ वर्षांत भारत चीनलाही एका बाबतीत मागे टाकू शकतो... आणि ती बाब म्हणजे 'लोकसंख्या'... होय, भारत २०२७ पर्यंत चीनला मागे टाकत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश बनू शकतो. भारताच्या लोकसंख्येत २०५० पर्यंत २७.३ करोडची वाढ होऊ शकते. यासोबतच भारत शतकाच्या अंतापर्यंत जगातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेला देश राहू शकेल.
संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक तसंच सामाजिक प्रकरणांच्या विभागाच्या 'पॉप्युलेशन डिव्हिजन'नं 'द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्ट २०१९ हायलाईटस्' प्रकाशित केले आहेत. या अहवालानुसार, येत्या ३० वर्षांत जगातील लोकसंख्या दोन अरबांहून अधिक वाढण्याची शक्यता आहे. २०५० पर्यंत लोकसंख्या ७.७ अरबहून वाढून ९.७ अरबवर पोहचू शकते.
या अहवालानुसार, विश्वातील एकूण लोकसंख्या या शताच्या अंतापर्यंत जवळपास ११ अरबपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. जगात जी लोकसंख्या वाढ होईल त्यातील सर्वात जास्त लोकसंख्या भारत, नायजेरिया, पाकिस्तान, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो, इथियोपिया, तंजानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिकामध्ये होण्याची शक्यता आहे.