israel strike on Iran Inside Story : जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे असं आतापर्यंत अनेकदा म्हटलं गेलं. मग ते रशिया युक्रेन युद्ध असो किंवा, इस्रायल आणि इराण यांच्यामधील संघर्ष असो. शनिवारी पुन्हा याचीच प्रचिती आली आणि जगभरातील सुरक्षा यंत्रणांचं लक्ष इस्रायल आणि इराणकडेच लागलं. शनिवारी या कट्टर शत्रूंमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आणि इस्रायलनं इराणवर हवाई हल्ले चढवले. इस्रायलचा हा हल्ला देशाच्या इतर शत्रूंसाठीही सूचक होता असं जागतिक घडामोडींच्या अभ्यासकांचं म्हणणं.
इराणवर सूड उगवण्याच्या हेतूनं इस्रायलनं हा हल्ला केला. असं म्हटलं जातंय की, इस्रायलनं हल्ला करण्याआधी एक फोन केला, फोनवर हिरवा कंदिल मिळताच अखेर हल्ल्याचं पाऊल उचलण्यात आलं. पण, हा फोन कोणाला केला?
जागतिक स्तरावरील सूत्रांच्या माहितीनुसार इराणवर हल्ला करण्यापूर्वी इस्रायलकडून देशाच्या सुरक्षा मंत्रिमंडळाशी संपर्क साधण्याच्या हेतूनं फोन करण्यात आला होता. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच हा हल्ला झाला. इस्रायल टाईम्सच्या माहितीनुसार इराणवरील या हल्ल्यासाठी एका रात्रीतच इस्रायलच्या संरक्षण मंत्रिमंजळातील सर्व सदस्यांनी एकमतानं भूमिका मांडली होती.
CNN च्या माहितीनुसार फोनवरून या हल्ल्यासाठी मतदान करण्यात आलं होतं. ज्या क्षणी संरक्षण मंत्रिमंडळाकडून हल्ल्यासाठी मंजुरी मिळाली, त्याच्या पुढच्याच क्षणी म्हणजेच मध्यरात्र उलटून 2.30 वाजता इराणला इस्रायलनं घेरलं. यामध्ये लष्करी छावण्यांना प्रथम भक्ष्यस्थानी घेण्यात आल्याची माहीत समोर आली.
1 ऑक्टोबरला इराणनं जो हल्ला केला होता त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलच्या यंत्रणांमध्ये एकमत होत नव्हतं. पण, शनिवारी रात्री हा अडथळाही दूर झाला. इथं हल्ल्यानं इराण हादरलं आणि तिथं देशात हाहाकार माजला. या हल्ल्यासोबतच इस्रायल आणि इराण यांच्यातील समीकरणं आणखी चिघळली असून, पश्चिम आशियायी देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
A video released by @IDF shows Israeli Chief of the General Staff, Herzi Halevi, commanding the strike on Iran from the Israeli Air Force underground command center in Camp Rabin (The Kirya).pic.twitter.com/zEWThUK0Lq
— Iran International English (@IranIntl_En) October 26, 2024
दरम्यान, इस्रायली लष्करानं या हल्ल्याचे अनेक व्हिडीओ शेअर केले. जिथं वायुदलाचा तळ, जवान अशी दृश्य पाहायला मिळत आहेत. इस्रायली लष्कराकडून इराणवर बेछूट हल्ला करण्यासाठीचे आदेश दिले जात असल्याचं इथं स्पष्टपणे पाहायला मिळालं. माध्यमांच्या वृत्तांमध्ये केल्या जाणाऱ्या दाव्यानुसार इराणवरील हल्ल्यापूर्वी याची माहिती इस्रायलनं अमेरिकेला दिली होती. यामध्ये इराणमधील अण्वस्त्रसज्ज भागामध्ये हल्ला करू नये असाच सल्ला अमेरिकेच्या वतीनं देण्यात आला होता. अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काउंसिलच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भातील माहिती देत इस्रायलनं केलेला हा हल्ला आत्मरक्षणाच्या दृष्टीनं उचललेलं पाऊल असल्याचं म्हटलं.