एकता सुरी, झी २४ तास, मुंबई : धुव्रीय प्रदेशातले लोक बर्फाच्या इग्लूत राहतात. तुम्हालाही इग्लूत राहण्याची इच्छा असेल तर एक टूर कंपनी तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. तुम्हाला चक्क काचेच्या इग्लूत राहण्याची संधी मिळणार आहे.
उत्तर धुव्र कायम बर्फाच्छादित असतो. याच उत्तर धुव्रावर आता सामान्यांना सहलीला जाता येणार आहे. 'कक्सलंटेन आर्टीक रिसॉर्ट'वर राहता येणार आहे. अतिशय प्रतिकूल वातावरण असलेल्या उत्तर धुव्रावरील या हॉटेलमध्ये तुम्हाला पंचतारांकित सुविधा दिल्या जाणार आहे.
काचेच्या इग्लूतला मुक्काम हा या सहलीचं खास आकर्षण असणार आहे. या काचेच्या इग्लूतून तुम्हाला मोकळ्य़ा आकाशात झोपल्याचा भास होणार आहे. शिवाय तुम्हाला आकाशातला रंगोत्सवही पाहता येणार आहे.
फक्त एक महिनाभर हे रिसॉर्ट पर्यटकांसाठी खुलं राहणार आहे. या इग्लूत तुम्हाला सोना बाथसह अनेक पंचतारांकित सुविधा मिळतील.
'स्लोव्हबोर्ड़' या शहरातून तुमच्या सहलीला सुरुवात होईल. दोन दिवस स्लोव्हबोर्डच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये घालवल्यानंतर आधी हेलिकॉप्टर आणि नंतर कुत्र्यांची स्लेजगाडी तुम्हाला तुमच्या काचेच्या इग्लूपर्यंत घेऊन जाईल.
हनिमून कपल आणि एकट्या पर्यटकांसाठी इथं वेगवेगळी पॅकेजस आहेत. पण तुम्हाला एकट्यालाही ही सहल करायची असेल तर एका रात्रीचे फक्त ७५ लाख भरण्याची तयारी ठेवा.