Middle East Turkey Earthquakes 33000 People Killed In 1939: दक्षिण तुर्की (Turkey) आणि उत्तर सीरियामध्ये (Syria) सोमवारी तब्बल 46 लहान मोठे भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले आहेत. या भूकंपांमध्ये मोठी जिवीतहानी झाली असून आतापर्यंत 1900 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. तर अमेरिकेतील जिओलॉजिकल सर्वेनं आणखीन धक्के तुर्कीला बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यापैकी काही धक्के एवढे मोठे होते की साइप्रस, ग्रीस, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया, युनायटेड किंग्डम, इराक आणि जॉर्जियासारख्या देशांमध्येही कंपनं जाणवली. या भूकंपामुळे तुर्कीमध्ये आतापर्यंत 3000 हून अधिक इमारतींची पडझड झाली आहे. हजारो लोक बेघर झाले असून अनेकजण या पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भूकंप काहिरा, लेबनॉन, साइप्रसमध्येही चांगलाच जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीमधील भूकंपग्रस्त प्रांताची राजधानी असलेल्या गाजियांटेपच्या उत्तरेला होता. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार तुर्कीने सुरक्षेच्या दृष्टीने भूमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील सेहना निर्यात टर्मिनलवरील तेलाच्या पाईप लाइनमधील पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात थांबवला आहे. मात्र कच्च्या तेलाची पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनींवर याचा परिणाम झालेला नाही. अहवालामधील माहितीनुसार, इस्तांबुलमधील टेक्निकल युनिव्हर्सिटीमधील भूगर्भ शास्त्रज्ञ ओकान तुयूसुज यांनी 1939 मध्ये तुर्कीत आलेल्या भूकंपनंतरचा हा सर्वात मोठा भूकंप असल्याचं म्हटलं आहे. 1939 साली एर्जिकनच्या पूर्वेकडील शहरामध्ये आलेल्या भूकंपामध्ये 33 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
तुर्कीमध्ये भूकंपाचं केंद्र असलं तरी शेजारच्या सीरिया देशामध्येही इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून 400 हून अधिक लोक मरण पावले आहेत. याशिवाय सरकारच्या नियंत्रणात असलेल्या 700 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सरकारी आकडेवारीमध्ये म्हटलं आहे. बंडखोरांच्या नियंत्रणात असलेल्या प्रदेशातील आकडेवारी समोर आलेली नाही. सध्या समोर आलेली 400 मृतांची आकडेवारी ही अलेप्पो, हमा, लताकिया आणि टार्टस या चार शहरांमधील आहे. सीरियामधील वृत्तसंस्था असलेल्या 'सना'ने दिलेल्या माहितीनुसार भूकंप पश्चिम किनाऱ्यावरील लताकियापासून दमिश्कपर्यंत जाणवला. या भूकंप केंद्राचे प्रमुख रायद अहमद यांनी 'सना'ला दिलेल्या माहितीनुसार हा भूकंप 1995 साली राष्ट्रीय भूकंप केंद्राची स्थापना झाल्यानंतरचा सर्वात मोठा भूकंप आहे.
तुर्की हा जगातील सर्वात सक्रीय भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एका क्षेत्रामध्ये वसलेला देश आहे. या ठिकाणी अनेकदा मोठे भूकंप येतात. यापूर्वी 1999 साली ईशान्य तुर्कीमध्ये आलेल्या मोठ्या भूकंपामध्ये इस्तंबूलमध्ये जवळजवळ 1000 लोकांचा मृत्यू झाला होता. तर एकूण 18,000 लोक यामध्ये ठार झाले होते. हा भूकंप 7.4 रिश्टर स्केअलचा होता. जानेवारी 2020 मध्ये इलाजिगमध्ये 6.8 तिव्रतेचा मोठा भूकंप आला होता ज्यात 40 जणांचा मृत्यू झालेला. याच वर्षामध्ये ऑक्टोबर महिन्यात एजियन येथे झालेल्या 7.0 रिश्टर स्केअलच्या भूकंपामध्ये 114 जणांचा मृ्त्यू झाला होता.