Mount Everest Video : गिर्यारोहण किंवा ट्रेकिंगच्या वाटांवर निघणाऱ्या प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं. ते म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याचं. लहानपणापासूनच एव्हरेस्टबाबतच्या गोष्टी ऐकल्यामुळं त्याविषयीचं कुतूहल या स्वप्नपूर्तीसाठी गिर्यारोहकांना वेळोवेळी प्रेरणा देत असतं. याच प्रेरणेनं मग सुरुवात होते ती म्हणजे लहानमोठे डोंगरमाथे सर केल्यानंतर एव्हरेस्टच्या वाटेवर निघण्याची. (Mount Everest turned into worlds highest garbage place watch devastating video )
आतापर्यंत जगातील सर्वाधिक उंच शिखर म्हणून गणल्या गेलेल्या एव्हरेस्टच्या पायथ्यापासून त्याच्या शिखरापर्यंत बऱ्याच ठिकाणांवर गिर्यारोहकांनी आपला ध्वज रोवला. विविध देशांतील गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केला. या खडतर चढाईमध्ये काहींनी प्राणही गमावले. पण, मागील काही वर्षांमध्ये हाच एव्हरेस्ट बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. कुठे जागतिक तापमानवाढीला फटका त्यालाही बसताना दिसतोय, तर कुठे चक्क या एव्हरेस्टवर गर्दी इतकी होतेय की Traffic Jam सदृश्य परिस्थितीसुद्धा निर्माण झाली होती.
बर्फाच्छादित हिमशिखरं, उभे चढ आणि सोसाट्याचा वारा. असा आव्हानांची परिसीमा पाहणारा एव्हरेस्ट सध्या गुरदमरतोय तो म्हणजे इथं निर्माण झालेल्या कचऱ्याच्या ढिगामुळं. ज्या एव्हरेस्टवर साधारण 70 वर्षांपूर्वी तेनजिंग नोर्गे आणि एडमंड हिलेरी यांनी एव्हरेस्टवर पहिल्यांदाच चढाई केली होती त्याच एव्हरेस्टवर येणारा प्रत्येक गिर्यारोक सरासरी 8 किलो कचरा मागे सोडून जातो.
Disheartening to see the accumulation of garbage at Camp IV on Mt #Everest (8848.86 m). It's high time we address this issue with urgency and commitment. Let's demand stricter regulations, enforcement of clean climbing practices, and effective waste management strategies. Video… pic.twitter.com/KGMlRmUuZk
— Everest Today (@EverestToday) May 28, 2023
खाद्यपदार्थांची पाकिटं, तंबू आणि त्यांचे अवशेष, ऑक्सिजन टँक आणि तत्सम गोष्टींचा कचरा सध्या या सर्वाधिक उंचीच्याच पर्वतावर वाढतानाच दिसत आहे. सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे. जिथं एका कँपच्या आजुबाजूला असणारा कचरा पाहून मान शरमेनं खाली जात आहे.
एव्हरेस्ट सर करणं ही कोणत्याही गिर्यारोकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी बाब. किंबहुना एक असं यश ज्याचा विसर आयुष्यभर पडणार नाही. पण, हे लक्ष्य साध्य करताना याच गिर्यारोहकांकडून अजाणतेपणानं निसर्गाची अगाध लीला असणाऱ्या या पर्वताची नासधूस होत आहे. त्यामुळं ही बाब कुठेतरी थांबण्याचीच गरज असल्याचं आवाहन सध्या अनेक पर्यावरणस्नेही संस्था करताना दिसत आहेत. कारण, येणाऱ्या पिढ्यांसाठीही एव्हरेस्ट तितकाच खास असणं अपेक्षित आहे.