सेऊल: गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्या मृत्यूविषयी सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उत्तर कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीकडून किम जोंग उन यांनी प्याँगयाँग येथे झालेल्या एका सोहळ्याला हजेरी लावल्याची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सुंचोन परिसरात हा सोहळा पार पडला. यावेळी किम जोंग उन यांच्यासोबत त्यांची बहीण किम यो जाँग यादेखील उपस्थित होत्या.
उत्तर कोरियन प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये काळ्या पोशाखातील किम जोंग उन हसतमुखाने कार्यक्रमस्थळी उद्घाटनाची फीत कापताना दिसत आहेत. यावेळी किम जोंग उन यांनी कारखान्यातील कर्मचाऱ्यांशी संवादही साधला. या कारखान्याचे काम पूर्ण झाल्याचे पाहून माझे वडील आणि आजोबांना समाधान वाटले असते, असेही किम जोंग उन यांनी म्हटले. किम जोंग उन यांनी अशाप्रकारे सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावल्याने आता त्यांच्याविषयीच्या सर्व अफवांना पूर्णविराम मिळेल.
दरम्यान, या कार्यक्रमात किम जोंग उन यांनी अमेरिका किंवा इतर देशांविषयी कोणतेही थेट वक्तव्य केल्याचे ऐकिवात नाही. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्याविषयी सूचक भाष्य केले होते. माझ्याकडे किम जोंग उन यांच्याविषयी सांगण्यासारखे काही आहे. मात्र, मी ते योग्यवेळी सांगेन, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
यापूर्वी ११ एप्रिलला किम जोंग उन सत्तधारी पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यावेळी लोकांना किम जोंग उन यांचे शेवटचे दर्शन झाले होते. यानंतर १५ एप्रिल रोजी किम जोंग उन यांच्या आजोबांच्या जयंतीचा कार्यक्रम होता. मात्र, किम जोंग उन या कार्यक्रमाला न आल्याने त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. कारण २०११ साली उत्तर कोरियाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी पहिल्यांदाच हा कार्यक्रम चुकवला होता.
त्यामुळे किम जोंग उन यांना गंभीर आजार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाल्यानंतर किम जोंग यांचा मृत्यू झाला, असेही सांगितले जात होते. किम यांच्यानंतर त्यांची बहीण किम यो जाँग उत्तर कोरियाचा कारभार चालवणार असल्याचा दावा केला जात होता. मात्र, कोणतीही खात्रीशीर माहिती समोर न आल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तर कोरियाविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.