ब्युरो रिपोर्ट : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अजूनही यश आलेलं नाही. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत कोरोनाची रुग्णसंख्या तब्बल २० लाखांवर गेली आहे. आतापर्यंत १ लाख १२ हजारांवर लोकांचा मृत्यू झाला असून योग्य उपाययोजना केली नाही तर सप्टेंबरपर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होईल, असं तज्ज्ञांचा अंदाज आहे.
अमेरिकेत कोरोना रुग्ण आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. २४ तासांत अमेरिकेत एक हजारावर बळी गेले. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेत रोज २० हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत १ लाख १२ हजार ९०० लोकांचा बळी गेला आहे आणि कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू आटोक्यात आणण्यात अमेरिकेला अजूनही यश आलेलं नाही.
तज्ज्ञांच्या मते अमेरिकेतील परिस्थिती गंभीर आहे. हॉरवर्ड्स ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्युटचे प्रमुख आशिष झा यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, अमेरिकेत जरी कोरोनाचे रुग्ण आणखी वाढले नाहीत, आता आहे तशीच स्थिती राहिली, तरी सप्टेंबरपर्यंत दोन लाख रुग्णांचा मृत्यू होईल.
विशेष म्हणजे अमेरिकेतील सर्व ५० राज्यांमध्ये व्यवहार खुले करण्यास सुरुवात करण्यात येत आहे. अमेरिकेत मेमोरियल डेपासून म्हणजे २५ मे पासून रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे.
टेक्सास आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये गेल्या महिन्यापेक्षा कोरोनाचे अधिक रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्कमध्ये बसला असून आतापर्यंत २४ हजारांवर लोकांचा न्यूयॉर्कमध्ये कोरोनाने बळी घेतला आहे. तर न्यूजर्सीमध्ये १२ हजारांवर रुग्णांचा मृत्यू झाला आहे.