नवी दिल्ली : आपण आकाशातलं इंद्रधनुष्य नेहमी पाहतो. पण कधी तुम्ही रंगबेरंगी डोंगर पाहिलेत? आकाशातल्या इंद्रधनुष्यातले सात रंग मोहवून टाकणारे असतात. हेच आकाशातले रंग तुम्हाला जमिनीवर पाहायला मिळाले तर? तुम्ही म्हणाल ही फक्त कल्पना आहे. पण ही कल्पना नाही तर हे सत्य आहे. सप्तरंगी डोंगररांगा अस्तित्वात आहेत. या डोंगररांगा पाहण्यासाठी तुम्हाला चीनच्या गांन्सू प्रांतात जावं लागेल.
चीनच्या डेनक्सिया लँडफॉर्म जिआँग्राफिकल पार्कमध्ये या रंगीत डोंगररांगा पाहायला मिळतात. जवळपास २०० चौरस मैल भागावर या पर्वतरांगा पसरल्यात.
या डोंगररांगांमध्ये वेगवेगळ्या रंगाचे दगडांचे आणि वाळूचे थर पाहायला मिळतात. या वेगवेगळ्या रंगांमुळे डोंगररांगेचं सौंदर्य खूपच खुलून दिसतं. चीनच्या उत्तरेकडील किलीयन पर्वतरांगेत सप्तरंगी डोंगर आहेत.
१९२० साली या पर्वतरांगेचा शोध लागला. ही पर्वतरांगा हिमालयापेक्षाही जुनी आहे. वाळूचे खडक आणि गाळाच्या सच्छिद्र खडकांपासून हे डोंगर तयार झालेत. लोह आणि मॅगनिज सारखी खनिजं विपूल प्रमाणात आहेत. शिवाय भूगर्भातल्या झालेल्या हालचालींमुळे डोंगरात वेगवेगळ्या रंगाचे खडकांचे स्तर पाहायला मिळतात.
२००९ साली युनेस्कोनं हेरिटेज साईटचा दर्जा रेन्बो व्हॅलीला दिलाय. जगातून लाखो पर्यटक रेन्बो व्हॅली पाहण्यासाठी येतात. पर्वतावरील हे इंद्रधनुष्य डोळ्यात साठवतात. निसर्ग हाच सर्वात मोठ्या निर्माता आहे याचा प्रत्येय रेन्बो व्हॅलीत आल्याशिवाय येत नाही.