मुंबई : सोशल मीडियावर सध्या एका लहान बाळाचा ७० हजार इंजेक्शनच्या सुयांसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. ६१ हजार जणांनी हा फोटो फेसबूकवर शेअर केला आहे. पॅकर फॅमिला फोटोग्राफी या फेसबूक पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे बाळ झाल्यानं या जोडप्यानं असा फोटो काढून आनंद व्यक्त केला आहे. ४ वर्ष, ७ वेळा केलेले प्रयत्न आणि १,६१६ इंजेक्शन दिल्यानंतर या बाळाचा जन्म झाल्याचं आईनं सांगितलं आहे.
पॅट्रिशिया ओनिल आणि किंबर्ली असं या बाळाच्या पालकांचं नाव आहे. आयव्हीएफवेळी घेतलेल्या प्रत्येक इंजेक्शनची सुई या बाळाच्या आईनं जपून ठेवली होती.
आययूआय तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही दोन वेळा गर्भधारणेसाठी प्रयत्न केला. पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आम्ही आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवलं. पण अनेकवेळा आयव्हीएफमुळेही निराशा झाली. पण अखेर आमच्या प्रयत्नांना यश आलं, अशी प्रतिक्रिया या बाळाच्या पालकांनी दिली आहे. आमच्या बाळाचा फोटो एवढा व्हायरल होईल, असं आम्हाला वाटलंही नव्हतं, असं बाळाचे पालक म्हणाले.