Indian Citizen Died in Russia : जून 2023 मध्ये रशिया आणि युक्रेन युद्धाला सुरुवात झाली. या युद्धाला आता जवळपास वर्ष होत आलं आहे. पण दोन्ही देशांनी माघार घेतलेली नाही. या युद्धात आतापर्यंत मोठ्याप्रमाणावर वित्त आणि जिवितहानी झालीय. आता यात नवीन माहिती समोर आली आहे. इतर देशातील लोकांची फसवणूक करुन या युद्धात ढकललं जात असल्याचं धक्कादाय वास्तव उघड झालं आहे. एका भारतीय नागरिकाच्या (Indian Citizen) मृत्यूने ही बाब समोर आली आहे.
युद्धात भारतीय नागरिकाचा मृत्यू
रशिया-युक्रेन युद्धात हैदराबादमधल्या एका व्यक्तीचा मृ्त्यू झाला. या व्यक्तीचं नाव मोहम्मद असफान (Mohammad Asfan) असं होतं. मोहम्मद असफान रशियाच्या लष्करातून युक्रेनविरुद्ध युद्ध लढत होता. एका एंजेटने नोकरी देण्याच्या बहाण्याने मोहम्मद असफानला रशियाला पाठवलं, तिथे त्याला थेट लष्कराबरोबर युद्धासाठी पाठवण्यात आलं.
मोहम्मद असफान हा अवघ्या 30 वर्षांचा होता. नोकरी देणाऱ्या एजंटने असफानबरोबरच अनेक भारतींची फसवणूक करुन त्यांना रशियाला पाठवलं आहे. मोहम्मद असफान याला पत्नी आणि दोन मुलं आहेत. नोकरी मिळेल या आशेने तो एजंटच्या भूलथापांना फसला. काही आठवड्यांपूर्वीच जवळपास डझनभर भारतीयांना धोक्याने रशियन लष्करात भरती केलं गेलं होतं. युक्रेनविरुद्धच्या या युद्धात हे भारतीय फ्रंटलाईनवर होते.
मोहम्मद असफानप्रमाणेच अनेक भारतीय रशियन लष्करातून युक्रेनविरुद्ध लढतायत. रशियात जवळपास 100 भारतीय नागरिकांना रशीयन लष्करात सहभागी करुन घेतलं आहे. पण हा आकडा जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीयांचा व्हिडिओ व्हायरल
पंजाबमधल्या होशियारपूरमध्ये राहाणाऱ्या काही तरुणांचा एक व्हिडिओ (Indian nationals tricked into Ukraine war) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हे तरुण भारत सकरकरकडे मदतीसाठी अपील करताना दिसत आहेत. फसवणूक करुन आपल्याला युक्रेनविरुद्धच्या युद्धात पाठवल्याचा दावा या तरुणांनी केला आहे. एक्सवर 105 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. यात सात तरुण रशियन सैन्याचे कपडे घातलेले दिसत आहेत. यातला एक तरुण व्हिडिओ रेकॉर्ड करत आपली व्यथा मांडताना दिसतोय. या तरुणाचं नाव गगनदीप सिंह असल्याचं समोर आलं आहे.
गगनदीपने दिलेल्या माहितीनुसार हे सर्व तरुण रशियात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गेले होते. त्यांच्याकडे 90 दिवसांचा व्हिजा होता. तिथून या तरुणांना बेलारुसला जायचं होतं. रशियात एका एजेंटने बेलारुसला पाठवण्याचं आश्वासन दिलं. बेलारुसला गेल्यानंतर तो एंजट अचानक गायब झाला. तिथल्या पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतलं आणि रशियन सैन्याच्या हवाली केलं. या तरुणांकडून जबरदस्तीने काही कागदपत्रांवर सही करुन घेण्यात आली. या तरुणांवर युक्रेनविरुद्धच्या लढ्यात उतरण्यासाठी दबाव टाकला जात आहे.