मुंबई : चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘ तियाँगगाँग ‘ ही रविवारी १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याची माहिती युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले होती. अखेर 2 एप्रिल 2018 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 6:43 वा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला व पुढील 3-4 मिनिटांमध्ये आकाशात मोठ्या प्रमाणात उल्का सदृश्य आगीचा लोळ निर्माण करीत 06:46 वाजता दक्षिण पॅसिफीक समुद्राच्या मध्यभागी असलेल्या छोट्याशा 'ताहिती' देशाजवळ कोसळले.
'तियाँगगाँग' ही प्रयोगशाळा आठ हजार पाचशे किलोग्रॅम वजनाची असून सुमारे साडेदहा मीटर लांबीची आहे. ही प्रयोगशाळा पृथ्वीकडे झेपावताना रविवार १ एप्रिल रोजी पहाटे १ वाजल्यापासून सायं. ७ वाजेपर्यंत कधीही चार मिनिटे भारतावरून जाणार आहे असे सांगण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्राचा भाग येत असून ती अडीच मिनिटांत महाराष्ट्रावरून जाईल. या प्रवासात ती भारतातही कोसळण्याची शक्यता होती.
जगभरातल्या तमाम अवकाश संशोधन संस्था या घटनेवर लक्ष ठेवून होत्या. ताशी 28 हजार किलोमीटर वेगानं पृथ्वीच्या वातावरणात शिरताना तियाँगगाँग 1चे अनेक तुकडे होतील. त्यातील बराचसा भाग वातावरणाशी घर्षण होऊन जळून खाक होण्याचीही शक्यता आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
1979 मध्ये स्कायलॅब हे अमेरिकन अंतराळ स्थानक अशाचप्रकारे पृथ्वीवर कोसळलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियात त्याचे छोटे तुकडे विखुरले होते. तियाँगगाँग 1 च्या निमित्तानं स्कायलॅबच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.