ऑनलाइन टॅक्सी सेवा उबरने प्रवास करताना अनेकदा चालक तुम्ही राइड कॅन्सल केली तर आम्ही तुम्हाला कमी पैशात घेऊन जाऊ अशी ऑफर देतात. थेट 100, 200 रुपये वाचत असल्याने अनेकजण ही ऑफर स्विकारतात आणि मग हे पैसे चालकाच्या खिशात जातात. दरम्यान अशाच पद्धतीने राईड्स कॅन्सल करत तब्बल 23 लाख रुपये कमावले आहेत. Insider ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅलिफोर्नियामधील 70 वर्षीय चालकाने वर्षाला 30 टक्क्यांहून अधिक राईड्स रद्द केल्या. तसंच 10 टक्क्यांपेक्षा कमी राईड्स स्विकारल्या आहेत. 2022 मध्ये त्यांनी जवळपास 1500 ट्रिप्स केल्या.
बिल असं या चालकाचं नाव असून ते सहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. यानंतर त्यांनी अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी उबर कंपनीत चालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण आपला वेळ वाया जाऊ नये यासाठी त्यांनी राईड स्विकारताना निवड ठेवली होती. बिल यांनी सांगितलं की, त्यांच्या परिसरातील वाढलेल्या किंमती यामुळे त्यांचे गाडी चालवण्याचे तास कमी झाले. ते आधी आठवड्यातून 40 तास काम करत असत. पण आता फक्त 30 तास काम करावं लागतं.
ते म्हणाले की, "मी माझा भरपूर वेळ नाही म्हणण्यात जातो. जोवर जास्त पैसे मिळत नाही तोपर्यंत मी काम करत नाही". बिल यांनी सांगितलं की, करोनामध्ये काही चालकांना आपलं काम काही काळासाठी थांबवावं लागलं असता मी आणि इतर चालक तासाला 50 डॉलर्स कमावत होते. पण आता चालकांच्या संख्येत वाढ झाल्याने, ते प्रती तास फक्त 15 ते 20 डॉलर्स कमावतात.
दरम्यान बिल यांनी आपण जास्त पैसे कमावण्यासाठी अनेक योजनाही आखल्याची माहिती दिली. ते शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 2.30 वाजेर्यंत विमानतळ आणि बार अशा ठिकाणी थांबायचे. या वेळेत येथे जास्त भाडं मिळतं. त्यांनी सांगितलं की, "जेव्हा विमान लँड होतं आणि प्रवासी उबरची मागणी करतात तेव्हा भाड्यात वाढ होते. 20 मिनिटांची राईड 10 डॉलर्सवरुन थेट 50 डॉलर्सवर पोहोचते".
70 वर्षीय बिल यांनी आपण वन-वे राईड स्विकारत नाही असंही सांगितलं. बिल यांनी आपला एक अनुभव शेअर करताना सांगितलं की, एकदा एका प्रवाशाला शहरापासून 2 तास दूर असणाऱ्या एका गावात सोडलं होतं. त्यासाठी 27 डॉलर्सचं भाडं मिळालं होतं. पण परतीला प्रवासी नसल्याने त्याला काहीच पैसे मिळाले नव्हते.
तथापि, अशी धोरणं आखताना काही धोकेही असतात. Uber च्या माहितीनुसार, ड्रायव्हरच्या ठिकाणामुळे ट्रिप नाकारणे किंवा रद्द केल्यास चालक त्यांच्या खात्याचं अॅक्सेस गमावू शकतो. बिल यांना याचा अनुभव आला नसला तरी, लांबच्या ट्रिप रद्द करण्यासाठी ड्रायव्हर्सना विमानतळ पिकअपपासून प्रतिबंधित करण्यात आल्याचं त्यांनी ऐकलं आहे. जे ड्रायव्हर्स 10 टक्क्यांपेक्षा जास्त वेळा राईड रद्द करतात ते कंपनीच्या रिवॉर्ड प्रोग्राममध्ये प्रवेश गमावतात ज्यात विशिष्ट पेट्रोल स्टेशनवर सूट सारखे फायदे आहेत.
पण बिल आपल्या सध्याच्या गेम प्लानवर कायम राहणार आहेत. जेव्हा फायदा होणार आहे तेव्हाच राईड घेण्याचा त्यांचा निर्णय आहे. उबरवर अवलंबून न राहणं आपल्या उत्पन्नासाठी फायदेशीर असल्याचं ते सांगतात.