ओव्हनमध्ये भारतीय तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर Walmart च्या कर्मचाऱ्याचा मोठा खुलासा, 'बाहेरुन कोणीतरी...'

कॅनडात (Canda) भारतीय वंशाच्या गुरसिमरन कौरचा (Gursimran Kaur) 19 ऑक्टोबरला वॉलमार्टच्या (Walmart) वॉक-इन ओव्हनमध्ये मृतदेह आढळला. यानंतर एकच खळबळ उडाली. यादरम्यान वॉलमार्टच्या कर्मचाऱ्याने धक्कादायक दावा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 31, 2024, 07:14 PM IST
ओव्हनमध्ये भारतीय तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर Walmart च्या कर्मचाऱ्याचा मोठा खुलासा, 'बाहेरुन कोणीतरी...' title=

कॅनडात भारतीय वंशाच्या गुरसिमरन कौरचा (Gursimran Kaur) वॉलमार्टच्या (Walmart) वॉक-इन ओव्हनमध्ये मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. 19 ऑक्टोबरला ही घटना घडली. यादरम्यान वॉलमार्टच्या (Walmart) कर्मचाऱ्याने धक्कादायक दावा केला आहे. 19 वर्षीय गुरसिमरन कौरला दुसऱ्या व्यक्तीने ओव्हनमध्ये फेकलं असावं असा दावा वॉलमार्टच्या कर्मचाऱ्याने केला आहे. 

गुरसिमरन कौर 19 ऑक्टोबर रोजी हॅलिफॅक्समधील एका सुपरस्टोअरच्या उपकरणात मृतावस्थेत आढळून आली होती. अहवालानुसार, तिच्या आईला ती जळालेल्या अवस्थेत आढळली. तिची आईही गेल्या दोन वर्षांपासून स्टोअरमध्ये काम करत आहे. गेल्या आठवड्यात, पोलिसांनी सांगितले की मृत्यूचं कारण आणि पद्धत यांची पुष्टी होऊ शकेल अशा टप्प्यावर तपास अद्याप पोहोचलेला नाही. "तपास क्लिष्ट आहे आणि त्यात अनेक भागीदार एजन्सींचा समावेश आहे. या तपासासाठी बराच वेळ लागू शकतो," असं हॅलिफॅक्स प्रादेशिक पोलिसांनी सांगितलं आहे.

मात्र, वॉलमार्टच्या कर्मचाऱ्यांनी तिला वॉक-इन ओव्हनमध्ये बंद करून ठार केलं असावं अशी शक्यता व्यक्त केली आहे. TikTok वरील एका व्हिडिओमध्ये, ख्रिस ब्रीझी या सह-कर्मचाऱ्याने सांगितलं की वॉलमार्टमध्ये काम करताना तिने वापरलेलं ओव्हन हे बाहेरून चालू होतं आणि दरवाजाचे उघडणं खऱंच कठीण असतं. 

"मी यामध्ये फिट होईन की नाही हेदेखील मला माहित नाही," असं ब्रीझीने सांगितलं. आपण 5 फूट 1 इंच उंच असल्याचा दावा तिने केला आहे. वॉलमार्टमधील ओव्हन कसं कार्य करते याचं प्रात्यक्षिक दाखवताना तिने सांगितलं की, "मला आत जाण्यासाठी खाली वाकावं लागेल." यावेळी तिने निदर्शनास आणून दिलं की, ओव्हनच्या आत एक आपातकालीन लॅच आहे आणि अशी कोणतीही गोष्ट नाही ज्यासाठी कर्मचाऱ्याला ओव्हनमध्ये शारीरिकरित्या प्रवेश करावा लागेल", असंही तिने सांगितलं. 

मी कोणत्याही कामासाठी आत जाणार नाही. मग ते स्वच्छतेचं असो किंवा इतर असो असंही तिने सांगितलं. ब्रीझीने दावा केला की ओव्हन लॉक करण्यासाठी, तुम्हाला शर्व शक्ती लावून ढकलावं लागेल. "तिथे कोणीतरी स्वत: ला लॉक करू शकेल असा कोणताही मार्ग नाही," असं तिने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. गुरसिमरन कौरला दुसऱ्या व्यक्तीने ओव्हनमध्ये फेकून दिले असा तिचा विश्वास असल्याचे तिने सांगितले.

दरवाज आपोआप बंद होत नसल्याने यामध्ये काही अर्थ नाही असं ती म्हणाली. हा दरवाजा अशाप्रकारे डिझाईन करण्यात आलेला नाही. तुम्हाला तो पुश केल्यानंतर क्लिकचा आवाज ऐकावा लागेल असंही तिने सांगितलं. "मी सिद्धांत मांडण्याचा किंवा कोणताही कट आहे सांगण्याचा प्रयत्न करत नाही, वॉलमार्टचे बेकरी ओव्हन वापरण्यास इतके सुरक्षित असताना हे सगळं मान्य करणं कठीण आहे," असं ती पुढे म्हणाली.