हेमाली मोहिते, झी २४ तास, मुंबई : असं कधी झालं नव्हतं... एखादी बातमी माझ्याबरोबर आणि मी तिच्याबरोबर जगतेय. एखादी महत्त्वाची घटना घडते, त्याची BREAKING आमच्या पर्यंत येते, आणि ती प्रेक्षकांपर्यंत मांडतो आणि मग स्टुडिओतून बाहेर.... बाहेर आल्यावर त्या बातमीच्या Updates काय आहेत यावर लक्ष ठेवणं, इतपतच त्या बातमीचा आणि आमचा संबंध...(एखादी अत्याचाराची वा तत्सम बातमी बऱ्याचदा मनात घर करून राहते, ते वेगळं...) नाही म्हणायला मुंबईतला मुसळधार पाऊस घरी जाताना किंवा ऑफिसला येताना आमच्या प्रवासावर परिणाम करतो.
पावसामुळे लोकल बंद पडल्यावर घरी जाता न येणं आणि घरातल्या चिमुकल्यांचे चेहरे आठवून आमच्यातल्या आयांचे डोळे पाणवतात. किंवा एखादा मोर्चा किंवा बंद यामुळे आम्हालाही इतर सामान्यांप्रमाणे फटका बसणं वगैरेपर्यंत या बातम्यांचा (त्या दिवसापुरता) आमच्यावर प्रत्यक्ष परिणाम होतो...
पण गेलं वर्षभर ही बातमी काही आमची (अर्थात तुमचीही) पाठ सोडत नाहीए... बातमी आहे कोरोनाची.... गेल्यावर्षी नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चीनमध्ये कुठलातरी संसर्गजन्य रोग पसरतोय एवढंच वाचनात आलं होतं. आणि चीनमध्येच ना... हँ... आपल्यापर्यंत येईल किंवा नाही हा विचारही तेव्हा ही बातमी वाचताना आला नाही.
बेफिकिरी म्हणा किंवा अज्ञान... त्यानंतर जगभरात कोरोना पसरू लागला तरी एक मन सांगत होतं, भारतात येईपर्यंत औषधही येईल, त्यात काय (यात वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास म्हणा) आता बेफिकिरीची जागा फुक्या आत्मविश्वासाने घेतली होती... तरीही आपल्यावर कोरोनाचा काही परिणाम होईल असं वाटलं नव्हतं.
आणि भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि ती बातमी वाचताच आत्मविश्वासाची जागा काळजीने भरून गेली... त्यातही वेडं आशावादी मन समजावत होतं, ‘छे! आपल्यापर्यंत काही नाही....’ पण दुसरीकडे या कोरोनाची ओळख होऊ लागली होती. तोंडावर मास्क, स्कार्फ आले, बॅगेत सॅनिटायझर आले आणि जो सर्वच देशांत आला तो कडकडीत लॉकडाऊनही आला.
जी मुंबई रोज धावताना बघायची सवय झाली होती, ती मुंबई कोणत्याही मोर्चा-बंदशिवाय थांबली होती, स्तब्ध झाली होती... भारतात कोरोनाचा शिरकाव ही ब्रेकिंग वाचल्यानंतर घरी परतताना लोकल आपल्याला पुढचे काही महिने भेटनार नाही असंही मनाला शिवलं नव्हतं.... पण लोकल थांबली, बेस्ट थांबली, रिक्षा-टॅक्सी थांबल्या, कारखान्यांमधली घरघर थांबली, ऑफिसमधली वर्दळ थांबली... पण हे इथंच थांबणार नव्हते... या कोरोनाने अनेकांच्या घरातली चूल(गॅसही) थांबला... हे सारं डोळ्यांदेखत घडत होतं.
सारं थांबलं पण आम्हा न्यूजवाल्यांना थांबून चालणारं नव्हतं... डॉक्टर्स, आरोग्यसेवक, पोलीस या कोरोनायोद्ध्यांसारखी जोखीम अंगावर नव्हती पण त्यांच्या वाट्याला येणारं कौतुकही होणार नाही, हेही आम्हाला माहित होतं... पण आमचे न्यूजव्हील चालूच होतं. ९० टक्के बातम्या कोरोनाशी संबंधित....
मी सुरुवातीला म्हटलं ना! की असं कधी झालं नव्हतं…. स्टुडिओबाहेर आल्यावर त्या बातमीचा विचार फारतर मनाच्या एका कोपऱ्यात सुरू असायचा पण कोरोनाच्या बातमीने रोजचं जगणंही व्यापलं होते.... “आज कोरोनाचे इतके रुग्ण वाढले, आज देशातला कोरोनाचा पहिला बळी, आज राज्यातला पहिला बळी, आज मुंबईतला पहिला बळी” हे वाचताना जाणवलं, बाबा कोरोना तुला फारच साध्यात घेतलं की रे बाबा!’
स्टुडिओतून बाहेर आल्यावरही कोरोना डोक्यात पिंगा घालायचा (एका मॅत्रिणीने म्हटलं होतं, शरिरात घुसला तर काही नाही पण कोरोना डोक्यात घुसला तर वाईट)... कारण एकीकडे कोरोना कुठपर्यंत पसरलाय हे सांगताना, कोरोनामुळे किती पत्रकारमित्र बाधित झालेत हे ही कळायचं... ऑफिसवरून घरी परतताना ऑफिसच्या कारमधून बाहेर पाहवत नव्हतं.
सगळे रस्ते सुनसान.. ही स्तब्धता बेचैन करणारी असायची... कोरॉना मुळे अनेकांचे रोजगार गेलेत, मजुरांनी त्यांच्या गावी जायला सुरुवात केलीय, हे सगळं बतमीतून वाचत असतानाच कारमधून पाहत होतो, जथ्ठेचच्या जथ्थे गावी परतत होते… हे सारं भयाण वाटत होतं…
ऑफिसमध्येही काही सहकारी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर घरी जाताना मनात एक भीती--- मी कोरोनाची वाहक तर नाही ना... कारण घरी गेल्या गेल्या धावत येऊन बिलगणारं लेकरू डोळ्यांसमोर यायचं... लॉकडाऊनचं काटेकोर पालन करणारे घरचे आपल्या प्रोफेशनची किंमत तर नाही ना चुकवणार ही काळजी होती.
पण ती बोलून दाखवायची सोय नव्हती... कारण घरी गेल्यावर (अर्थात घरी गेल्यावर आधी स्वच्छ आंघोळ किंवा स्वच्छ हातपाय रगडून धुणे हे कटाक्षाने केल्यावर) घरातल्यांचा प्रश्न असायचा किती वाढले आज रुग्ण, कधी संपणार हे सगळं... सुरुवातीला खूप संयमाने उत्तरं द्यायचे... पण नंतर घरात एक शिरस्ता करून टाकला.... मी घरात आल्यावर कोरोनावरचे प्रश्न विचारायचे नाहीत... बातम्या वाचून (न्यजपेपरही बंद झाले होते) अर्थात नेटवर वाचून हवी ती माहिती मिळवा.
त्यात या कोरोनाने लागलेल्या लॉकडाऊनमुळे देशाचं आर्थिक गणित मंदावलं, त्याचा परिणाम इतरांप्रमाणे आमच्या कुटुंबाच्या आर्थिक गाड्यावर ही झाला होता… आमचं उत्पन्न ही मंदावल.... एकाचवेळी आरोग्याची काळजी आणि मनाची काळजी घ्यावी लागणार होती.
त्याचवेळी एका मोठ्या राजकीय नेत्याने त्यांच्या फेसबुक लाईव्हमधून जनतेला सल्ला दिला होता, काटकसरीचा... पुढचे काही दिवस काटकसर हाच नियम ठेवला पाहिजे.... हे सारं मनाला समजावून सांगत होते. आपल्या आधीच्या पिढीला काटकसर नवी नव्हती, पण आपल्याला आता बऱ्याच ' झटपट ' जीवनाच्या सवयी बदलाव्या लागतील, हे जाणवलं...
पण या कोरोनाने काही गंमती जमती ही घडत होत्या.... कोरोनाबाबत काही ना काही वाचताना आरोग्याशी संबंधित गोष्टी कळत होत्या... गंमत म्हणजे हाय़ड्रोक्लोरोक्विन, रेमडेसीवी, क्वारंटाईन, आयसोलेशन असे शब्द नेहमीच्या परवलीचे झाले होते... कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि सगळे घरातले सदस्य एका घरात बंदिस्त झाले. याचे दोन्ही परिणाम पाहायला मिळाले.
एरव्ही घड्याळ्याच्या काट्यावर धावणारे आईवडील मुलांना २४ तास दिसत होते. अर्थात या लॉकडाऊनने लोकांना वर्क फॉर्म होम शिकवलं, जे याआधी केवळ आयटी प्रोफेशनल्सची टर्म होती. आम्हा न्यूजवाल्यांनाही वर्क फ्रॉम होम करावं लागलं... पण त्यातही काहींनी क्वालिटी टाईम आपल्या कुटुंबियांसोबत घालवला.
काही ठिकाणी तर रोज घरी राहून नवनव्या पाककृतींचा सपाटा लावला... मी ही याला अपवाद नव्हते... पण तिथंही कोंडी व्हायची... कारण लॉकडाऊनमुळे दुकानं बंद... जिन्नस आणायचे कसे आणि कुठून... किराणा दुकानं काही वेळच खुली राहायची...
मॉल, डीमार्टची सवय झालेल्या आपल्या समाजाची सामान आणण्यासाठी फार धावपळ व्हायची… घरात धुनी भांडीपासून सारं काही करावं लागतं होतं… (नवरेमांडळी ही घरकामात गुंतली, किंबहुना गुंतवून घ्यावं लागलं)
कोरोनाने मनाला एकाचवेळी प्रॅक्टीकल आणि इमोशनल विचार करायला शिकवलं होतं. मला आईवडलांना भेटता येत नव्हतं... सुरुवातीचे तब्बल ४ महिने मी त्यांना पाहिलंच नाही.... केवळ लँडलाईनवरून तब्येतीची विचारपूस.... खुप घालमेल व्हायची... स्वतःला दुषणं ही दिली....
आईने मला असं एकटं टाकलं असतं का.. पण त्याचवेळी प्रॅक्टीकल मन समजवायचं.... तू सतत बाहेर असतेस तुझ्या मुळे त्यांना धोका नको.... कारण कोरोनाला ही सगळे समसमान… तो थोर लहान, गरीब- श्रीमंत असं काही पाहून येत नव्हता ना...
अनलॉकिंग सुरू झाल्यावर काहीसं हायसं वाटलं खरं.... पण धोका अजून टळला नाहीए ही जाणीवही होत होती... या कोरोनाने सगळं जग व्यापलं, घरं व्यापली, मनही व्यापलं... पण आता बस्स... कोरोनाने हे २०२० वर्ष पूर्ण काबीज केलं... पण ज्याची सुरुवात होते त्याचा अंत असतोच ना... हे थांबावं... आणि या नव्या संकटातून नवी उत्तरं सापडावीत... नवा विश्वास, नवी उमेद जन्माला यावी... हीच नव्या वर्षाच्या आगमनाला सदिच्छा...!