प्रशांत अनासपुरे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : रसिक मनांवर राज्य केलेल्या बालंगधर्वांची भूमिका असो की, लोकमान्य...एक युगपुरुषमधील लोकमान्य टिळकांचा करारी बाणा असो अभिनेता सुबोध भावेने आपल्या अभिनयाने या भूमिका गाजवल्या आणि प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. कट्यार काळजात घुसलीतील साधा-सरळ सदाशिवही त्याने तितक्याच साधेपणाने सहजतेने आत्मसात केल्याचं दिसून आलं. सविता दामोधर परांजपे, डॉ. काशीनाथ घाणेकर या सिनेमांबरोबरच आता सुबोध भावे प्रेक्षकांना थेट त्याच्या ‘पुष्पक विमानात’ घेऊन जाणार आहे...रंगभूमीशी नाळ जपलेल्या सुबोध भावेने मराठी सिनेसृष्टीत आता एक नवा ‘भावे’प्रयोग यशस्वीपणे सुरू केलाय असं म्हणावं लागेल.
मला दुखः विकायची नाहीत. मनोरंजनासाठी दोन घटका सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना एखाद्या कलाकृतीतून निर्मळ आनंद देता आला तर त्यासारखं दुसरं सुख नाही असं म्हणणारा सुबोध भावे गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सिनेसृष्टीत आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करतो आहे. रवी जाधवने दिग्दर्शित केलेल्या बालगंधर्व चित्रपटात सुबोध फक्त एक अभिनेता होता. सिनेमाला कौशल इनामदारसारख्या संगीतकाराने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं हा आणखी एक दुग्धशर्करा योग. आनंद भाटेसारख्या गायकाने त्यात आणखी बहार आणली हा दर्दी प्रेक्षकांसाठी तर जणू अपूर्व योग ठरला. मात्र एखादा चित्रपट म्हटला की सुबोध त्या चित्रपटात केवळ अभिनेत्याच्या रुपात सीमित रहात नाही. बालगंधर्वांवर सिनेमा होऊ शकतो हे ज्याक्षणी सुबोधला वाटले, तेव्हापासून त्याची धडपड सुरू झाली होती. चित्रपटाला साजेसा दिग्दर्शक शोधणं, निर्माता शोधणं याची शोधाशोध तो सुरू करतो. आणि संगीत हे तर खुद्द त्याच्यासाठीच एक हळवा कप्पा. संगीताबाबत तो कमालीचा जागरूक असतो. विशेषतः अलीकडच्या काळात शास्त्रीय संगीताशी त्याची जुळलेली नाळ आणि यातून आकाराला येत असलेली कलाकृती आणखी बहार आणते आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर चित्रपट करायचा हे सुबोधचं अनेक दिवसांचं स्वप्न. त्यासाठी तो कामालाही लागला होता. योगायोगाने ओम राऊतसारख्या युवा दिग्दर्शकाच्या मनातही हाच विषय घोळत होता आणि दोघांच्या विचारविनिमयातून लोकमान्य...एक युगपुरुषसारखी एक बाणेदार ठसठशीत कलाकृती पडद्यावर आली. लोकमान्य टिळकांची भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी सुबोधने पडद्यामागे जे कष्ट घेतले त्याचा प्रत्यय अर्थातच पडद्यावर दिसून आला. कट्यार काळजात घुसरी हा सुबोधचा आणखी एक सिनेमा दर्दी रसिकांसाठी मेजवानी ठरला. विशेषतः शास्त्रीय संगीतापासून दुरावलेल्या पिढीसाठी ही सांगीतिक मेजवानी पुन्हा जोडणारी ठरली. दिग्दर्शक म्हणून सुबोधने इथे त्याची वेगळी छाप पाडली. पुन्हा एकदा कट्यारच्या निमित्ताने मराठी सिनेमातून रसिकांच्या ओठांवर रुळतील अशा गीतांची बहार अनुभवायला मिळाली. शंकर महादेवन, राहुल देशपांडे, महेश काळे यांची गाणी ठिकठिकाणच्या मैफलीतूनही ऐकायला मिळू लागली. अलीकडे खूप कमी सिनेमातील गाण्यांना हे भाग्य मिळतं. कट्यारमधला साधा, सरळ सदाशिव रंगवताना सुबोधने तो साधेपणा आणि सच्चेपणा रसिकांच्या ह्रदयापर्यंत पोचवला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
राष्ट्रीय पुरस्कार आणि सुबोध भावेचे चित्रपट यांचं नातं गेल्या काही वर्षांपासून दिसून येतंय. बालगंधर्व सिनेमातील सुबोधची भूमिका भलेही गाजली, मात्र सिनेमातली सुरांची बरसात प्रेक्षकांना अधिक तृप्त करणारी ठरली. पडद्यावर सुबोधने या भूमिकेचं सोनं केलं, तर पडद्यामागे गायक आनंद भाटे यांनी आपल्या बहारदार आवाजाची बरसात केली. आनंद भाटेंना बालगंधर्वतील गाण्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यानंतर कट्यार काळजात घुसरी या सिनेमाच्या बाबतीतही हाच योग पुन्हा आला. कट्यारमधला सदाशिव प्रेक्षकांना भावला. मात्र पडद्यामागे असलेला सूर निरागस दर्दी प्रेक्षकांची तेवढीच दाद मिळवून गेला. महेश काळे हे नाव याच सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत गाजू लागलं. कट्यारमधील गाण्यासाठी अमेरिका रिटर्न असलेले महेश काळे राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यानंतर सुमारे एक-दीड वर्ष महेश काळे भारतभर आणि भारताबाहेरही अनेक ठिकाणी सूर निरागसची मैफल रंगवताना दिसले. आता तिसरा योग जुळून येईल, अशी आशा करूया. पुष्पक विमान सिनेमातून सुबोध भावेने आणखी एका शास्त्रीय संगीताचा उपासक असलेल्या गायकाला सिनेमात गायला भाग पाडलंय. जयतीर्थ मेवुंडी यांनी पुष्पक विमानमध्ये आपल्या सुरांची सजावट केलीये. नुकतीच पुष्पक विमानमधली गाणी रसिकांच्या भेटीला आली आहेत. यात जयतीर्थ मेवुंडी, शौनक अभिषेकी आणि आनंद भाटे या त्रिकुटाला पुष्पक विमानाच्या सांगीतिक सफरीमध्ये बसवलंय. अर्थातच या तिघांसाठीही हा एक निश्चितच वेगळा अनुभव असणार आहे. आनंद भाटेंना आपण नेहमी शास्त्रीय संगीत, अभंगवाणी, भक्तीरचना सादर करताना पाहतो. पुष्पक विमानमध्ये आनंद भाटेंना एका वेगळ्याच शैलीच्या गाण्यातून ऐकायला मिळणारे. सुबोधचा आणखी एक मित्र राहुल देशपांडे या सिनेमात गाणं नाही गाणार. मात्र या सिनेमात तो अभिनय करणार आहे. जयतीर्थ मेवुंडींचा या सिनेमातील गाण्यांसाठी लागलेला सूर पाहता आगामी राष्ट्रीय पुरस्कारात जयतीर्थ मेवुंडींचं नाव आल्यास आश्चर्य वाटायला नको. अर्थातच मेवुंडी असो किंवा शौनक अभिषेकी सुबोधसाठी ही हॅटट्रिक ठरेल. आनंद भाटे, महेश काळेंनंतर आणखी एका मित्राला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्यास साथसंगत केल्याचा आनंद सुबोधला नक्कीच होईल...
मित्रांशिवाय जीवन व्यर्थ आहे, असं म्हणणारा सुबोध जगमित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. अभिनय, संगीत, दिग्दर्शन, लेखन अशा सर्वच क्षेत्रातली त्या क्षेत्रावर मनस्वी प्रेम करणारी माणसं जमवणं हे सुबोधचं खास टेक्निक म्हणावं लागेल. जुन्या-नव्या कलाकारांना एकत्र करून मैफल रंगवणं ही कला सुबोधला चांगलीच जमलीये. म्हणूनच बालगंधर्वमध्ये त्याने राहुल देशपांडेला अभिनयाची गळ घातली. तर कट्यारमध्ये सचिन पिळगावकर, शंकर महादेवन अशा मंडळींना एकत्र जमवलं. पुष्पक विमानमध्ये पुन्हा एकदा राहुल देशपांडे पडद्यावर असणार आहे. तर भारतातील सर्वात श्रेष्ठ अभिनेता म्हणून ज्यांना सुबोध मान देतो, त्या मोहन जोशींना सुबोधने आपली पहिलीच निर्मिती आणि लेखन असलेल्या पुष्पक विमान सिनेमात काम करायला भाग पाडलंय. सकाळच्या शिफ्टची सवय नाही असं सांगणाऱ्या मोहन जोशींना शूटिंगदरम्यान सुबोध महिनाभर रोज सकाळी सहा वाजता त्यांच्या घरी आणण्यासाठी आवर्जून हजर असायचा. मित्रांची गप्पांची मैफल जमवणं हा सुबोधचा सर्वाधिक आवडता छंद असावा. पुण्यात सुबोधच्या घरी खंडेरायाचा भंडारा असतो. त्यावेळी अनेक मित्रांना तो आवर्जून निमंत्रण देतो. गाण्याच्या मैफली ठेवतो आणि मग रात्रभर जागर...मैत्रीचा...गाण्यांचा..आणि कॉलेजमधल्या आठवणींचाही...
एकदा मैत्री जमली की जमली हा सुबोधचा स्वभाव. मित्रावर विश्वास टाकणारा सुबोध म्हणूनच वेगळा ठरतो. पुष्पक विमानच्या निमित्ताने अशाच एका मित्राला दिग्दर्शक म्हणून पुढे आणणारा सुबोध आपल्याला पहायला मिळतो. वैभव चिंचाळकर हा सुबोधचा आधीपासूनचा मित्र. कट्यारच्यावेळी वैभव सुबोधचा सहदिग्दर्शक म्हणून काम करत होता. वैभवची कामावरची श्रद्धा आणि निष्ठा पाहून जेव्हा मी निर्माता म्हणून पहिला सिनेमा करेन, तेव्हा तू त्या सिनेमाचा दिग्दर्शक असशील असं वचन सुबोधने आपल्या या मित्राला दिलं होतं. तो शब्द पुष्पक विमानच्या निमित्ताने सुबोधने खरा ठरवला. सुबोधची पहिली निर्मिती-लेखन असलेल्या पुष्पक विमानचा दिग्दर्शक म्हणून वैभव चिंचाळकर जेव्हा एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवर आला तेव्हा सुबोधच्या चेहऱ्यावरचा आनंद अधिक समाधान देणारा वाटत होता. दोन सच्चा मित्रांची जोडी एकमेकांना मिठी मारताना पाहून न बोलताही बरंच काही बोलून गेली.
बालगंधर्व...2011 मध्ये आलेल्या बालगंधर्व या सिनेमातील भूमिकेने काय दिलं ? असं जेव्हा सुबोधला विचारलं तर आपण निवडलेल्या या क्षेत्रात उंच झेप घेऊ शकतो, याचा विश्वास दिल्याचा सुबोध सांगतो. सुबोध म्हणतो, सर्वात महत्वाचं म्हणजे या भूमिकेने माझा संगीताशी परिचय करून दिला. याच सिनेमाने मला असं वाटतं की आधीच्या पिढीशी नाळ जोडण्याचं काम केलं. आजोबा आणि नातू यांच्यातील सांगीतिक दरी मिटवण्याचं काम केलं. शास्त्रीय संगीत हे आपल्यासाठी नाही असं मानणारी नवी पिढी बालगंधर्वमुळे पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळली,गाण्यांच्या मैफलीला जाऊ लागली याचं अधिक समाधान वाटतंय. याच सिनेमातील भूमिकेविषयी एक प्रतिक्रिया आजही आठवतेय. एक गृहस्थ सिनेमा पाहिल्यानंतर मला भेटले आणि म्हणाले, आम्ही बालगंधर्वंना खूप ऐकलंय. त्यांना पाहिलं नाही. मात्र आम्ही सुबोध भावेंच्या रुपात बालगंधर्वंना पाहिल्याचा भास झाला. माझ्यासाठी केवढी मोठी ही प्रतिक्रिया...
मी पुण्याचा असल्याने लोकमान्य टिळक, नारायण पेठेतील केसरीवाडा, त्यांची भाषणं आणि त्यांचं व्यक्तीमत्व याविषयी खूप गोष्टी ऐकलेल्या होत्या. शाळेत त्यांचे धडे वाचून अचंबित व्हायचो. लोकमान्य एक युगपुरुष या सिनेमाच्या निमित्ताने त्यांचा जीवनपट बघता आला. त्यांच्यासारखे कपडे परिधान करता आले, त्यांच्या व्यक्तीमत्वाचा जवळून परिचय झाला हे माझ्यासाठी खूप आनंददायी आणि समाधान देणारं होतं. एक करारी बाण्याच्या लढवय्या व्यक्तीमत्वाची भूमिका पडद्यावर साकारायला मिळाली हा आयुष्यभरासाठीचा ठेवा वाटतो. लोकमान्यमधील भूमिका पाहून शाळेतल्या काही मुलांनी स्वतः माझी त्या भूमिकेतली चित्र काढून पाठवली त्यावेळी झालेला आनंद कधीही विसरू शकत नाही.
नव्या पिढीला शास्त्रीय संगीताची गोडी नाही, हा समज कट्यार काळात घुसली या सिनेमाने खोटा ठरवला याचा अधिक आनंद वाटतो. खरं तर दिग्दर्शक म्हणून माझा हा पहिलाच सिनेमा. मात्र एका नव्या पिढीला शास्त्रीय संगीताशी जोडणारा हा चित्रपट ठरला हा आनंद अधिक आहे. आजही अनेकजण सांगतात की हा सिनेमा पाहून आम्ही गायन शिकायला सुरुवात केली, तबला वाजवायला सुरुवात केली. यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो ?
पुण्यातल्या घरी आजोबांची एक खोली आहे. त्या खोलीसमोर आजही उभं राहिलं की आजोबांसोबतच्या अनेक आठवणी आठवतात. खरंतर त्याच खोलीच्या दारासमोर एकदा उभा असताना पुष्पक विमानची कथा सुचली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजोबा आणि नातवाच्या अविट गोडीच्या नात्याची ही कथा आहे. तुमच्या-आमच्या अनेकांच्या जीवनात या हळव्या नात्याची गोडी आहे. आजोबा आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आटापिटा करतात. आपण त्यांचं एखादं स्वप्न विचारतो का ? आणि विचारलंच तर ते पूर्ण करतो का ? याच गोष्टीवर आहे पुष्पक विमान. अभिनयाबरोबरच निर्माता लेखक म्हणून पहिल्यांदा यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येतो आहे. मित्र वैभव चिंचाळकर या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. मोहन जोशींचा मी फॅन आहे आणि ते या सिनेमात आहेत हे माझ्यासाठी खूप आनंद देणारं आहे. नरेंद्र भिडेंचं संगीत, शौनक अभिषेकी, आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी यांची बहारदार गाणी...असा हा सगळा आनंदसोहळा आहे.
एकूणच मराठी सिनेइंडस्ट्रीत सुबोध भावे या नावाला आता एक वेगळं स्थान मिळू लागलंय. यात आता येतील ते सिनेमे न करण्याची भूमिका सुबोधला घ्यावी लागेल. सिनेमांची निवड करताना केवळ संख्याबळाकडेच अधिक लक्ष दिलं गेलं तर अपयशाचे ‘फुगे’ फुटण्याचाच धोका अधिक असणार. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेतली तर मराठी सिनेमात नव्याने सुरू झालेला हा ‘भावे’प्रयोग निश्चितच टिकून राहिल आणि सुबोध भावे हे नाव आणखी त्याच दिमाखाने यापुढेही घोडदौड करीत राहिल यात शंका नाही...