मुंबई : हिंदी चित्रपटांमध्ये एक प्रतिष्ठीत आणि तोडीची अभिनेत्री म्हणून सीमा बिस्वास यांच्याकडे पाहिलं जातं. गुवाहाटीमध्ये जन्मलेल्या सीमा आसाममधील नलबाडी येथे लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांची आई आसामी नाटक आणि सिनेमांत अभिनेत्री असल्यामुळं आपल्याही लेकिनं अभिनय क्षेत्रात कारकिर्द घडवावी असं त्यांचं स्वप्न होतं.
आईच्या स्वप्नाखातर त्यांनी नाटकांमध्य़े काम सुरु केलं. आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं.
पण, बिस्वास यांनी साकारलेली फुलनदेवी विशेष गाजली. 'बँडिट क्वीन' या चित्रपटात भूमिका साकारत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं.
एनएसडीमध्ये एका नाटकादरम्यान शेखर कपूर यांच्या हाती सीमा बिस्वास यांची काही छायाचित्र लागली होती. ज्यानंतर त्यांनी सीमा यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली.
सीमा मात्र काही कारणास्तव त्यांना भेटू शकल्या नाहीत. तेव्हा खुद्द शेखर त्यांचं नाटक पाहण्यासाठी गेले आणि तिथे त्यांना या चित्रपटाची ऑफर दिली.
1994 मध्ये सीमा पहिल्यांदात फुलनदेवीच्या रुपात जगासमोर आल्या. 'बँडिट क्वीन' हा चित्रपट फुलनदेवीच्या जीवानातील काही सत्य प्रसंगांवर आधारलेला होता.
फुलन नावाच्या या मुलीचं झालेलं शोषण आणि तिच्यावर झालेले अत्याचार पाहता हीच ठिकगी पुढे जाऊन मोठ्या विस्तवाचं रुप कशी घेते हे या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं.
चित्रपटातील काही दृश्यांमुळं मोठा वादही झाले, ज्यामुळं सीमा हमसून हमसून रडल्या होत्या.
बलात्काराचं दे दृश्य...
चित्रपटातील एका दृश्यामध्ये फुलनवर ठाकूर बलात्कार करतो असं दाखवण्यात आलं होतं. शिवाय तिला विवस्त्रच विहिरीत उडी मारायलाही सांगतो असं दाखवलं गेलं होतं.
चित्रीकरणावेळी तिथे फक्त दिग्दर्शक आणि कॅमेरामन इतकीच माणसं होती, पण हा सीन पूर्ण झाल्यानंतर टीममधील प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
वडील हे सर्व पाहतील तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल, हाच विचार सीमा यांच्या मनात घर करत होता. त्यांनी दिग्दर्शकांना हे दृश्य वगळण्याचीही विनंती केली.
पण, तसं झालं नाही. या दृश्यासहित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. सीमा यांच्या वडिलांनीही चित्रपट पाहिला आणि मुलीच्या अभिनयाचं तोंड भरून कौतुकही केलं.
सेन्सॉरनं या चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे आणले. बलात्काराची दृश्य ही अतिशय बोल्ड पद्धतीनं साकारण्यात आल्यामुळं त्यांच्याकडून हरकत व्यक्त करण्यात आली होती.