मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट हिनं आई सोनी राजदान यांच्या वादात अडकलेल्या 'नो फादर्स इन कश्मीर' या सिनेमाचा बचाव केलाय. हा सिनेमा करुणा आणि सहानुभूतीवर आधारीत आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन अर्थात सीबीएफसीनं यावर लावलेले 'निर्बंध' हटवण्यात यावेत, असं आलियानं म्हटलंय. दुसरीकडे, सीबीएफसीनं मात्र या सिनेमावर निर्बंध लावण्यात आल्याच्या बातमीला नकार दिलाय.
'आई सोनी राजदान आणि अश्विन कुमार यांचा सिनेमा 'नो फादर्स इ कश्मीर'साठी मी उत्सुक आहे. सिनेमाच्या टीमनं काश्मीरमधील तरुणांच्या प्रेमकथेवर खूप मेहनत घेतलीय. मला आशा आहे की सीबीएफसीकडून सिनेमावरील निर्बंध मागे घेतले जातील. हा सिनेमा करुणेवर आधारीत आहे आणि प्रेमाला एक संधी मिळायला हवी, असं ट्विट आलियानं केलंय.
Was soo looking forward to mom's @nofathers_movie #nofathersinkashmir!! @Soni_Razdan @ashvinkumar & team worked super hard for this honest teens love story in Kashmir. Really hope the CBFC would #lifttheban. It’s a film about empathy & compassion..let’s give love a chance!
— Alia Bhatt (@aliaa08) January 17, 2019
सीबीएफसी मुंबईचे विभागीय अधिकारी तुषार कारमेरकर यांच्या म्हणण्यानुसार, या सिनेमावर सीबीएफसीनं मर्यादा लावण्याच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. हे केवळ दुर्भाग्यपूर्ण आहे... आणि यासंबंधीत सर्व जबाबदार व्यक्तींनी याची काळजी घ्यायला हवी.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सिनेमा गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून सीबीएफसीमध्ये अडकलाय. तसंच या सिनेमाला 'ए' श्रेणीचं प्रमाणपत्र देण्याची शिफारस करण्यात आलीय. सिनेमाच्या निर्मात्यांनी मात्र बोर्डाच्या या निर्णयाला आव्हान देताना 'यू/ए' श्रेणीचं प्रमाणपत्र देण्याची मागणी केलीय. याआधी अभिनेत्री स्वरा भास्कर हिनंही या सिनेमाचा बचाव केला होता.