...आणि रणवीरला हळद लागली

चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंदच या क्षणाचं त्याच्या आयुष्यातील महत्त्वं सांगून जात होता. 

Updated: Nov 5, 2018, 07:50 AM IST
...आणि रणवीरला हळद लागली title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्नसोहळ्याआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने नंदी पुजा करत हे शुभकार्य निर्विघ्न पार पडण्याची प्रार्थना केली. तर, इथे नुकतीच रणवीरला हळदही लागली आहे. 

रविवारी रणवीरच्या वांद्रे येथील निवासस्थानी त्याचा हळदी समारंभ पार पडला. यावेळी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजम्यामध्ये रणवीर नवरदेवाच्या रुपात शोभून दिसत होता. 

बी- टाऊनच्या या अभिनेत्याच्या हळदीला त्याच्या मित्रपरिवारासोबतच कलाविश्वातील काही जवळच्या व्यक्तींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये रणवीर कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मासोबत सेल्फी काढत असताना पाहायला मिळालं. 

मुख्य म्हणजे रणवीरच्या चेहऱ्यावर असणारी हळद आणि त्याच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहणारा आनंदच या क्षणाचं त्याच्या आयुष्यातील महत्त्वं सांगून जात होता. 

१४ आणि १५ नोव्हेंबर या दोन दिवसांमध्ये रणवीर आणि दीपिका विवाहबंधनात अडकणार असून, आतापासूनच त्यांच्या लग्नाच्या पूर्वी पार पडणाऱ्या विधींना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून, सगळेचजण या उत्साही वातावरणात तितक्याच उत्साहात सहभागी होत असल्याचं पाहायला मिळत आहेत.