Shah Rukh Khan Security : सेलिब्रिटींच्या जगण्याचा, राहणीमानाचा आणि त्यांना मिळणाऱ्या प्रसिद्धीचा चाहत्यांना कायम हेवा वाटत असतो. 'आयुष्य हवं तर असं', ही ओळ अनेकांच्याच तोंडी पाहायला मिळते. पण, याच कलाकारांच्या आयुष्यात असणारी काही आव्हानं इतकी गंभीर असतात की यंत्रणांनाच याची दखल घ्यावी लागते. असंच काहीसं सध्या अभिनेता शाहरुख खान याच्या आयुष्यात घडत आहे.
कमालीच्या यशशिखरावर असणाऱ्या आणि मागील अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. इथून पुढं शाहरुख खानला Y+ सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे.
'पठाण' आणि 'जवान' या चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे मुंबई पोलिसांनी शाहरुख खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. Y+ सुरक्षेमुळे आता शाहरुखच्या सुरक्षेत 24 तास सहा वैयक्तिक सुरक्षा अधिकारी तैनात राहतील. तर शाहरुखचं निवासस्थान असणाऱ्या मुंबईतील वांद्रे येथील 'मन्नत' बंगल्याबाहेर 5 बंदूकधारी सुरक्षा रक्षक तैनात असतील.
वाय प्लस सुरक्षा जाहीर होण्यापूर्वी शाहरुखच्या सुरक्षेसाठी फक्त दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात ठेवण्यात येत होते. पण, आता मात्र चित्र वेगळं असणार आहे. कलाजगतामध्ये शाहरुखआधी फक्त सलमान खानला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. तर, अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांना X दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, खेळाडू आणि व्यावसायिकांना विशेष सुरक्षा पुरवली जाते. केंद्र आणि राज्य शासन यासंदर्भातील निर्णय घेतं. जीवाला धोका असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींनाही ही सुरक्षा पुरवली जाते. सुरक्षेचे X, Y, Z आणि एसपीजी कमांडो असे प्रकार आहेत. प्रत्येक श्रेणीनुसार सुरक्षेत वाढ होत जाते. शाहरुखला मिळालेल्या वाय प्लस सुरक्षेमध्ये त्याच्यासाठी 10 सशस्त्र कमांडो सुरक्षेसाठी तैनात असतील. शाहरुख भोवती यापूर्वीत सुरक्षा रक्षकांचा मोठा गराडा पाहायला मिळतो. त्यातच आता नव्यानं त्याच्या सुरक्षेत भर पडत असल्यामुळं आता त्याला पाहणंही कठीण होणार अशीच भावना चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.