बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित चित्रपट 'जोधा अकबर'मध्ये (Jodhaa Akbar) बहिण भावाची भूमिका निभावली होती. सोनूने एका भावाची भूमिका केली आहे जो आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी स्वतःच्या राज्याच्या बाहेर फेकलं जाण्याचा धोका पत्करतो. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत सोनू सूदने चित्रपटाच्या सेटवर नेमका कसा अनुभव होता आणि ऐश्वर्या रायशी काय संभाषण झालं याचा खुलासा केला आहे.
"मला आठवतंय की सुरुवातीला आम्ही एक सीन करत होतो आणि ती बोलत होती. यानंतर ती अचानक थांबली आणि म्हणाली, 'तू मला पाची आठवण करून देतोस' ती खूप गोड आहे, उत्तम सह-कलाकार आहे. माझे संपूर्ण बच्चन कुटुंबाशी खूप चांगले संबंध आहेत. अभिषेक आणि मी 'युवा', 'हॅपी न्यू इयर' मध्ये काम केलं आहे. मिस्टर बच्चनसोबत मी 'बुढ्ढा होगा तेरा बाप' मध्ये त्यांच्या मुलाची भूमिका केली होती. ते खूप छान लोक आहेत. तुम्ही त्यांच्यासोबत असता तेव्हा मजा करता," असं त्याने मॅशेबल इंडियाला सांगितले.
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सोनूने त्याच्या इजिप्तच्या प्रवासादरम्यान त्याला अभिषेक बच्चन समजल्याचं सांगितलं होतं. "मी इजिप्तला पोहोचताच तिथल्या लोकांनी मला तुमचा मुलगा समजलं. ते 'अमिताभ बच्चनचा मुलगा, अमिताभ बच्चनचा मुलगा' असं म्हणत होते. यामुळे मला व्हीव्हीआयपी वागणूक मिळाली. त्यांनी मला रांगेतून बाहेर काढले आणि वेगळे नेले. हे सर्व पाहून मला खूप छान वाटलं," असं तो म्हणाला.
त्याच भागात, सोनूने 'बुढ्ढा होगा तेरा बाप' मधील एका सीनमध्ये अमिताभ बच्चन यांना धक्का देताना आपल्याला फार संकोच वाटत होता असं सांगितलं. "बच्चन सर पोलीस स्टेशनमध्ये येतात, मी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत होतो आणि मला त्यांना मागे ढकलून त्यांना सांगावे लागते, 'निकल जाओ पोलिस स्टेशन से'. मी दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्यासोबत 2-3 चित्रपट केले आहेत. मी त्यांनी सांगितलं की, मला त्यांचं स्वागत करायला लावण्याऐवजी तुम्ही मला त्यांना धक्का देत आहात. म्हणून, मी त्यांना खूप हळू मागे ढकलले. बच्चन सर म्हणाले की काळजी करू नकोस, मला जोरात धक्का दे. खूप धाडस केल्यानंतर, मी त्यांना ढकलले आणि दृश्य छान झाले," अशी आठवण त्याने सांगितली.