बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखला जातो. नुकतंच 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने बॉलिवूडमधील अनेक चुकीच्या गोष्टी, पद्धतींवर बोट ठेवलं असून खडेबोल सुनावले आहेत. एजन्सी, एजंट्स यामुळे इंडस्ट्रीची प्रकृती बिघडली आहे असा थेट आरोप अनुराग कश्यपने केला आहे. तसंच ओटीटीमुळे कशाप्रकारे बॉलिवूडमध्ये चित्रपटांची कॉस्ट वाढली आहे याबद्दलही सांगितलं. दरम्यान यावेळी त्याने आपण एकदा अशाच मागण्यांमुळे अभिनेत्री अमृता सुभाषला चित्रपटातून काढून टाकल्याचा खुलासा केला.
"मी एक चित्रपट करत होतो, त्यात अमृता सुभाष होती. मी अमृता सुभाषसोबत तीन वेळा काम केलं आहे. त्यामुळे ती किती साधी आहे याची मला माहिती आहे. मला एक दिवस तिच्या मॅनेजरकडून काही मागण्या आल्या. त्यामध्ये सिंगल डोअर व्हॅनिट व्हॅन यासह इतर मागण्या करण्यात आल्या होत्या. मी ते पाहिल्यानंतर वेड लागलंय का असंच म्हटलं होतं. मी सरळ मॅनेजरला फोन केला आणि अमृता सुभाषला चित्रपटातून काढत असल्याचं सांगितलं. यानंतर मी फोन सरळ ठेवून दिला," असं अनुराग कश्यपने सांगितलं.
पुढे त्याने सांगितलं की, "त्यानंतर मला अमृता सुभाषचा फोन आला. माझी काय चूक झाली असं ती विचारत होती. कारण तिला तिच्या एजंटने काय मागितलं आहे याची माहितीच नवह्ती. यानंतर तिने मॅनेजरला चांगलंच सुनावलं. माझ्या नावे तू अशा गोष्टी कशा काय मागू शकतोस अशी विचारणा तिने केली". अनुराग कश्यपने अशा गोष्टी अनेकदा झाल्याचंही सांगितलं.
अभिनेता गुलशनही यावेळी उपस्थित होता. त्याने अनुराग कश्यपच्या विधानाशी सहमती दर्शवत सांगितलं की, "अनेकदा तर अभिनेत्यांवरही दबाव असतो. अशा कार्यक्रमाला जा, जाऊ नका असं सांगितलं जातं. याचं कारण ब्रँड बिल्डिंग करायचं असतं. अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना हा दबाव सहन करता येत नाही".
अनुराग कश्यपने यावेळी शाहरुख, सलमान आणि आमीर खानचं कौतुकही केलं. "मी मोठ्या स्टार्ससह काम करत नाही. पण इंडस्ट्रीत आपले तीन सर्वात मोठे स्टार शाहरुख, आमीर आणि सलमान जास्त कॉस्ट कॉन्शिअस आहेत. हे तिघेही चित्रपटासाठी मानधन घेत नाहीत, याउलट बॅकएण्ड पाहतात. प्रॉफिट शेअरिंग, ओटीटी राईट अशा गोष्टी घेतात. त्यांचा कोणताही चित्रपट महाग नसतो. यामुळे चित्रपटावर फ्रंट लोड येत नाही. तुम्ही गाडीवर फ्रंट लोड टाकलात तर गाडी वाकडी होईल"," असं अनुराग कश्यप म्हणाला.
"एजंट्स, एजन्सी यासाठी कारणीभूत आहेत. या एजन्सी मेकअप आर्टिस्ट, हेअर आर्टिस्ट यांचंही प्रतिनिधित्व करतात आणि त्यांचंही बॅकएण्ड घेतात. यामुळे कॉस्ट वाढते. यामुळे आज इंडस्ट्रीची प्रकृती बिघडली आहे. हे आधी होत नव्हतं," असा आरोप अनुराग कश्यपने केला आहे.
"ओटीटी आल्यापासून हे सुरु झालं आहे. 2017 नंतर याची सुरुवात झाली. ओटीटी इन्फ्लुएन्सर्स इंडस्ट्रीत येत आहेत. आता ओटीटी प्लॅटफॉर्म्सच ज्यांचे फॉलोअर्स जास्त ते अभिनेते असल्याचं सांगत आहेत. ज्यांना याची समस्या आहे, त्यांनीच ती सुरु केली आहे. 'जाने भी दो यारो' आणि 'अर्धसत्य' हे चित्रपट 2 लाखात तयार झाले होते. सर्वात महागडा चित्रपट 'रुप की रानी, चोरो का राजा' तर 10 कोटीत तयार झाला होता," अशी आठवणही त्याने करुन दिली.