मुंबई : ऍक्शन आणि विनोद अशा दोन घटकांना एकत्र आणत रोहित शेट्टी याने कायमच काही अफलातून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. त्याने स्वत:ची अशी एक वेगळी दिग्दर्शन शैलीच निर्माण करत बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख प्रस्थापित केली. पण, तुम्हाला माहितीये का, रोहित शेट्टीलाही झगमगाटाच्या या विश्वात संघर्षाचा सामना करावा लागला होता.
'गोलमाल', 'चेन्नई एक्स्प्रेस' यांसारखे चित्रपट साकारणारा रोहित शेट्टी हा एकेकाळी तब्बू, काजोल यांसारख्या तेव्हाच्या आघाडीच्या अभिनेत्रींसाठी स्पॉटबॉय म्हणूनही काम पाहात होता. इतकंच नव्हे, तर 'हकीकत' या चित्रपटासाठी तर, त्याने अभिनेत्री तब्बू हिच्या साड्यांना इस्त्रीही केल्याचं म्हटलं जातं.
अजय देवगन आणि रोहित शेट्टीचं एक खास समीकरण. पण, याच अजय देवगनसाठीही त्याने स्पॉटबॉय म्हणून काम पाहिलं आहे. याशिवाय 'फूल और काँटे', 'सुहाग', 'प्यार तो होना ही था' आणि 'राजू चाचा' या चित्रपटांसाठी रोहित शेट्टीने सहाय्यक दिग्दर्शनाचंही काम पाहिलं होतं.
सध्याच्या घडीला रोहित कोट्यवधींच्या संपत्ताचा मालक असला तरीही कलाविश्वात सुरुवातीच्या काळात मात्र त्याला दरदिवशी अवघे ३५ रुपये मिळत होते. असं असलं तरीही जिद्द, चिकाटी आणि चित्रपट कलेविषयी असणाऱ्या समर्पकतेच्या बळावर रोहितने यश संपादन केलंच.
पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ
येत्या काळात रोहितची अफलातून दिग्दर्शन शैली प्रेक्षकांना 'सूर्यवंशी' या चित्रपटातून पाहता येणार आहे. अजय देवगन, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि कतरिना कैफ या स्टारकास्टसह रोहित मनोरंजनाचा आणखी एक नजराणा प्रेक्षकांसमोर आणण्यसाठी सज्ज झाला आहे.