मुंबई : सैफ अली खानची मुख्य भूमिका असणाऱ्या 'लाल कप्तान' या चित्रपटाचा आणखी एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या ट्रेलरपासून उलगडत जाणारं एक रहस्य तिसऱ्या ट्रेलरमधून काहीसं स्पष्ट होत आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचत आहे.
दमदार पार्श्वसंगीत, 'लाल कप्तान'मधील पात्रांची झलक पाहता, हा चित्रपट सैफच्या कारकिर्दीतील एक अफलातून कलाकृती म्हणून सिद्ध होऊ शकतो. 'हर राम का अपना रावण, हर राम का अपना दसेरा' हा संवाद आणि त्याला जोड म्हणून सुरु असणारी दृश्य पाहता एका क्षणाला धडकीच भरते.
हिंसा, सूडभावना, वर्षानुवर्षे धुमसणारी क्रोधाग्नी हे मुद्दे चित्रपटाच्या ट्रेलरमधून अधोरेखित करण्यात आले आहेत. नवदीप सिंग दिग्दर्शित या चित्रपटाचं कथानक पाहता एका रहस्यमयी आणि तितक्याच थरारक विश्वाचं दर्शन घडणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.
आनंद एल राय आणि एरॉस इंटरनॅशनल यांची निर्मिती असणाऱा 'लाल कप्तान' हा चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आतापासूनच या चित्रपटाविषयीचं कुतूहल प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. सेक्रेड गेम्समध्ये दमदार भूमिका साकारणारा सैफ आता या रुपात बॉक्स ऑफिसवर राज्य करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
सैफसोबतच या चित्रपटातून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासुद्धा झळकणार आहे. याशिवाय मानव वीज, झोया हुसैन, दीपक डोब्रियाल हे कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तेव्हा आता त्यांच्या वाट्याला नेमक्य़ा कोणत्या भूमिका आल्या आहेत, याकडेच साऱ्यांचं लक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही.