मुंबई : बॉलिवूड अभिनेते आणि महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट सोमवारी हॅक झालं. 'प्रो पाकिस्तान' टर्किश हॅकर ग्रुपकडून त्यांचं अकाऊंट हॅक करण्यात आलं. ज्यानंतर सोशल मीडियावर लगेचच याविषयीच्या चर्चा सुरु झाल्या.
बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक केल्यानंतर त्यांचा प्रोफाईल फोटो बदलून त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं छायाचित्र लावण्यात आलं. शिवाय प्रोफाईल ज्या व्यक्तीचं आहे, त्याविषयी थोडी माहिती देण्यात येण्याच्या भागात 'लव्ह पाकिस्तान', असंही लिहिण्यात आलं.
ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यावरुन काही ट्विट करण्यात आले. ज्यामध्ये फुटबॉल खेळाचाही उल्लेख करण्यात आला आहे. हा एक मोठा सायबर हल्ला असल्याचं सांगत य़ाच ट्विटच्या माध्यमातून आईसलँडच्या फुटबॉल संघाकडून तुर्कस्थानच्या खेळाडूंना दिलेल्या वागणुकीचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
पुढील आणखी एका ट्विटमधून रमजान महिन्यात उपवास करणाऱ्या मुस्लिम धर्मियांवर हल्ला करणाऱ्या भारताचा निषेध त्यातून करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं.
दरम्यान, Ayyıldız Tim Turkish Cyber Armyकडून यापूर्वी अभिनेता शाहिद कपूर आणि अभिषे बच्चन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. बिग बींचंही ट्विटर अकाऊंट यापूर्वी २०१५ मध्ये हॅक झालं होतं. सध्याच्या घडीवला मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर युनिटकडून या प्रकरणीचा तपास सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.