मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या या लॉकडाऊनच्या काळात जरी अनेक व्यवहार ठप्प झाले असले तरीही त्याला पर्याय उपलब्ध आहेत. अगदी कलाविश्वातही प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी घेणाऱ्या मंडळींनी विविध मार्गांनी आणि निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून कलेचा नजराणा सादर करण्याचं काम सुरु ठेवलं आहे.
असाच एक नवा उपक्रम "स्वरंग मराठी" ह्या नव्या वहिनीने हाती घेतला आहे. विप्लवा एंटरटेनमेंट्स, पॅलेट मोशन पिक्चर्स यांच्या निर्मितीत साकारण्यात आलेल्या या 'किस्से बहाद्दर' कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी पडद्यामागचे काही धमाल किस्से सांगितले आहेत.
नाटकाच्या पडद्याआड, प्रयोगाच्या दरम्यान घडलेले काही किस्से रसिकांना "किस्से बहाद्दर" ह्या नव्या कार्यक्रमामधून अनुभवता येत आहेत.
संजय मोने, शरद पोंक्षे, विजय कदम, मंगेश कदम, लीना भागवत, शर्वाणी पिल्ले, अविनाश नारकर, भार्गवी चिरमुले, श्रुजा प्रभुदेसाई, ऋतुजा बागवे, शशांक केतकर आदी मान्यवर कलाकार ह्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. सचिन सुरेशने या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली आहे. तर, कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन सुश्रुत भागवत यांनी केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच "स्वरंग मराठी" च्या युट्युब चॅनल आणि सोशल मिडिया पेज वरून या कार्यक्रमाचे भाग दाखवण्यास सुरवात झाली आहे. तेव्हा आता या अनोख्या कार्ययक्रमातून नेमके कोणते अतरंगी किस्से प्रेक्षणांपुढे उलगडले जातात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.