मेघा कुचिक, मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचं शिखर गाठणाऱ्या जिद्दी सौंदर्यवती मान्या सिंग. मुंबईची ही मुलगी यंदाच्या मिस इंडिया स्पर्धेत रनर अप म्हणजे उपविजेती ठऱली. तिच्या संघर्षाची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
सामान्य घरात जन्माला आल्यानंतर संघर्ष करत स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या या तरुणीची जिद्दीची कहाणी नक्कीच असामान्य आहे. मान्या सिंग... तिच्या शिरावर मिस इंडिया रनर अपचा मुकूट घालण्यात आला, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण हे केवळ एका सौंदर्य स्पर्धेतलं यश नव्हतं. हे फळ होतं 20 वर्षांच्या अविश्रांत मेहनतीचं... रेड कार्पेटवर मोठ्या दिमाखात रॅम्प वॉक करणारी मान्या सिंग.. तिच्या या लखलखत्या यशात मोलाचा वाटा आहे तो तिच्या आईवडिलांचा... कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज परिसरात रिक्षा चालवणाऱ्या ओमप्रकाश सिंग यांची ही मुलगी.
ठाकूर व्हिलेज ते मिस इंडिया रनर अप अशी यशाची उत्तुंग झेप तिनं घेतली... लहानपणीच तिनं मिस इंडिया होण्याचं स्वप्न पाहिलं... आणि कठोर मेहनतीनं तिनं ते प्रत्यक्षात साकारलं... अगदी वेळप्रसंगी भांडी घासण्यापासून ते कॉल सेंटरमध्येही तिनं काम केलं.
सुरूवातीला मान्याच्या रिक्षाचालक वडिलांना हा वेडेपणा वाटायचा. मुलीनं शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावं, असं त्यांना वाटत असे. पण मान्याच्या जिद्दीपुढं त्यांनीही हार पत्करली आणि तिला साथ दिली. आज त्यांची मान अभिमानानं उंचावली आहे.
मान्याच्या आईच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू घळाघळा वाहत आहेत. कारण हे यश मिळवण्यासाठी मुलीनं घेतलेली मेहनत ही माऊली विसरलेली नाही. केवळ मान्याचे आईवडीलच नव्हे, तर कांदिवलीतल्या प्रत्येक रिक्षावाल्याची छाती अभिमानानं फुलून आली आहे.
आपल्या आईवडिलांसाठी लवकरच नवीन घर खरेदी करण्याची मान्याची इच्छा आहे. मान्या सिंग आणि तिच्या कुटुंबाचा हा संघर्ष इतर सामान्य मुलींसाठी मोठा आदर्श ठरणार आहे.
संबंधित बातमी: सामान्य घरातून आलेल्या मान्या सिंगचे काही खास फोटो