मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अनेकांचे जवळचे लोक हिरावून नेले आहेत.प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते प्रवीण तरडे यांनी देखील एक भावुक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. एकापेक्षा एक गाणी लिहून माझा दादा गेला असं म्हणत प्रवीण तरडे भावुक झाले.
देऊळबंद सिनेमाचे दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांची कोरोनाविरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. प्रणित कुलकर्णी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेते आणि निर्माते प्रवीण तरडे यांनी प्रणित कुलकर्णी यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करत फेसबुकवर भावुक पोस्ट लिहिली आहे.
'माझा प्रणित दादा गेला.. सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभू हरपला.. गीतकार ,लेखक ,दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी बद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही. देऊळबंद सिनेमाला माझ्या सोबत लेखन दिग्दर्शन आणि देऊळबंद , मुळशी पॅटर्न , सरसेनापती हंबीररावचा गीतकार … अ रा रा खतरनाक , उन उन वठातून , आभाळा आभाळा , गुरूचरीत्राचे कर पारायण , हंबीर तू खंबीर तू अशी एका पेक्षा एक गाणी लिहून प्रणितदादा गेल... कायमचा'
प्रणित कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची कोरोना विरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. प्रणित कुलकर्णी यांचं निधन झालं. प्रणित आणि प्रवीण तरडे फार वर्षांपासूनचे मित्र होते. गीतकार आणि म्युझिक अल्बमचा निर्माता म्हणून त्यांनी बराच काळ काम केलं होतं. देऊळबंद चित्रपट प्रणित कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला होता.