मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक, डॉ. जब्बार पटेल यांची परस्पर निवड करण्यात आल्यामुळे आता हा मुद्दा वादाच्या वळणावर आला आहे. मुंबईत १५ डिसेंबर २०१९ला म्हणजेच रविवारी होत असणाऱ्या नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत या मुद्द्याला अनुसरुन दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
नाट्यपरिषदेतर्फे होणाऱ्या आजच्या बैठकीत संमेलनाच्या अध्यक्षांची निवड होणं अपेक्षित असतं. पण, तसं न होता अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या प्रसाद कांबळी यांनी परस्पर याविषयीची घोषणा केली होती. त्याचाच विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे आता परिषदेच्या बैठकीनंतर अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल असणार, की मोहन जोशी यांचं नावही पुढे येणार हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रसाद कांबळी यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत नाट्य परिषदेतील दुसरा गट म्हणजे, मोहन जोशी यांच्या गटाकडून आपल्याला अध्यक्षपदाच्या निवडीविषयीची कोणतीही विचारणा न करताच पटेल यांची निवड करण्यात आल्याचा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. याच मुद्द्यावर बैठकीत आता नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
साधारण महिन्याभरापूर्वी, अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल यांचं नाव घोषित करण्यात आलं होतं. या पदासाठी जब्बार पटेल आणि अभिनेते मोहन जोशी यांनी अर्ज केले होते. त्यानंतर झालेल्या नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीच्या चर्चेत जब्बार पटेल यांची एकमताने निवड झाली, असं सांगण्यात आलं होतं. पण, वास्तवात मात्र या पदावरुन आता दोन गटांमध्ये विरोधी मतं असल्याचं लक्षात येत आहे.