प्रसाद ओकला दिघेसाहेबांच्या रुपात पाहून एकनाथ शिंदे भावुक, स्टेजवरच पडले पाया !

सर्वसामान्यांसह एकनाथ शिंदे यांनाही दिघेसाहेब अवतरल्याचा भास... भावुक होत प्रसाद ओकच्या पडले पाया !  

Updated: Apr 22, 2022, 01:02 PM IST
प्रसाद ओकला दिघेसाहेबांच्या रुपात पाहून एकनाथ शिंदे भावुक, स्टेजवरच पडले पाया ! title=

मुंबई : जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं... असं म्हणत विरोधकांच्या नाकावर टिच्चून जनमत मिळवणारं एक नाव म्हणजे दिवंगत धर्मवीर आनंद दिघे. जेव्हा जेव्हा शिवसेनेचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा आनंद दिघे आणि त्यांच्या समर्थकांचाही उल्लेख होतो.  बाळासाहेब ठाकरेंच्या मर्जीतले आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असणारे आनंद दिघे कोण होते, ते आजही अनेकांसाठी पूजनीय का आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रवीण तरडे दिग्दर्शित  'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 

सध्या सर्वत्र शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात त्यांची व्यक्तिरेखा अभिनेता प्रसाद ओक साकारत आहे. सध्या प्रसाद ओकच्या मेकअपचं कौतुक वाटत आहे. एवढंच नाही, तर शिवसैनिकांना देखील आनंद दिघे यांनाच समोर पाहत आहोत, असा भास होत आहे.

नुकताचं मुंबईत  'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' सिनेमातील गाण्याचा  लाँचिंग सोहळा पार पडला.  यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. सोहळ्या दरम्यान प्रसाद ओकला आनंद दिघे यांच्या रुपात पाहून एकनाथ शिंदे देखील भावुक झाले. 

गाण्याचा लाँचिंग सोहळा संपन्न झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि प्रसाद ओक यांचं फोटोसेशन सुरू होतं. यावेळी सर्वांसमोर एकनाथ शिंदे प्रसाद ओकच्या पाया पडले. सध्या प्रसाद ओक आणि एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.