Asha Nadkarni Passed Away : रुपेरी पडद्यावर आलेले काही चेहरे प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवतात. आशा नाडकर्णी या अभिनेत्रीचा प्रभाव याच स्वरुपाचा होता. आशा नाडकर्णी यांनी काल म्हणजेच 29 जून रोजी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रख्यात दिग्दर्शक व्हि. शांताराम यांनी ' मौसी ' या चित्रपटात आशाजी यांना प्रथम अभिनेत्रीच्या रुपात काम दिले. त्यांना ही संधी वयाच्या 15 वर्षांच्या होत्या तेव्हा मिळाली होती. त्यानंतर त्यांनी 'नवरंग' इत्यादी चित्रपटातून भूमिका साकारल्या. व्ही. शांताराम यांनी त्यांचे चित्रपटातील नाव ' वंदना' ठेवले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आशा नाडकर्णी यांचे मुंबईतील राहत्या घरी गुरुवारी रात्री निधन झाले. ते आपल्या कुटुंबीयांसोबत दक्षिण मुंबईमध्ये राहत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. अखेर वृद्धापकाळ आणि आजाराने त्यांचे निधन झाले. आशा नाडकर्णी यांच्या मुलाने माध्यमांना त्यांच्या निधनाची बातमी दिली.आशा नाडकर्णी यांच्या मागे त्यांचा मुलगा,सून व नातू आहेत.
आशा नाडकर्णी मुळच्या सामान्य कुटुंबातील, सोमवार पेठ येथील सारस्वत कॉलोनी मध्ये सुरुवातीला राहत होत्या. त्यांचे कुटुंब 1957 ला मुंबईत आले. तेव्हा पासून त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. आशा नाडकर्णी या एक उत्तम नृत्यांगना होत्या. 1957 ते 1973 या काळात त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले.
हेही वाचा : Satyaprem Ki Katha Box Office Collection Day 1: पहिल्या दिवशी 10 कोटीसुद्धा कमवू शकला नाही कार्तिकचा सिनेमा
आशा नाडकर्णी यांनी 'नवरंग' (1959), 'गुरु और चेला' (1973), 'चिराग' (1969), 'फरिश्ता' (1968), 'श्रीमानजी' (1968), 'दिल और मोहब्बत' (1968), 'अलबेला मस्ताना' (1967), 'बेगुनाह' (1970) या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याचसोबत त्यांनी ‘श्रीमान बाळासाहेब’ (1964) , 'वंदना', ‘क्षण आला भाग्याचा’ (1962) , ‘मानला तर देव’ (1970) सारख्या मराठी चित्रपटांत देखील काम केले होते.