मुंबई : अन्नू कपूर या व्यक्तिमत्वाचं नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर उभी राहते ती संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी. या बॉलिवूडला कोळून प्यायलेला माणूस म्हणजे अन्नू कपूर.
अन्नू कपूर या व्यक्तीकडे जेवढे किस्से असतील तेवढे किस्से फारच कमी लोकांकडे असतील. आपल्या अभिनयाने आणि सूत्रसंचलनाने प्रेक्षकांना अन्नू कपूर यांनी कायमच खिळवून ठेवलं आहे. बऱ्याच दिग्गज कलाकारांसोबत मित्रत्त्वाचं नातं असणाऱ्या आणि या कलाविश्वाला अगदी जवळून पाहिलेल्या अन्नू कपूर यांनी नेहमीच त्यांच्या बोलण्यातून विविध कलाकारांचे किस्से प्रेक्षकांसमोर मांडले आहेत.
असाच एक किस्सा त्यांनी नुकताच ‘बिग एफ. एम’च्या ‘सुहाना सफर विथ अन्नू कपूर’ या रेडिओ शोदरम्यान सांगितला. स्मिता पाटील आणि अन्नू कपूर यांच्यामध्ये असणारी मैत्री आणि कलाकारांमध्ये असणारं सुरेख नातं त्यांच्या या अनुभवातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. ‘मंडी’ या सिनेमातील किस्सा अन्नू कपूर यांनी या शोमध्ये शेअर केला. या सिनेमात दिग्गज कलाकारांचा अफलातून अभिनय पाहायला मिळाला होता. अन्नूजींच्या कारकीर्दीसाठी हा चित्रपट नवीन होता, किंबहुना त्यावेळी ही चित्रपटसृष्टीच त्यांच्यासाठी नवीन होती. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अन्नूजींना ‘बेताब’ या चित्रपटाची ऑफर आली आणि त्यानंतर त्यांना लगेचच या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बोलावणं आलं. या चित्रपटाच्या निमित्ताने कपूर यांनी पहिल्यांदाच हैद्राबाद ते बंगळुरु असा विमान प्रवास करायचा होता.
याआधी कधीच विमान प्रवासाचा अनुभव नसणारे अन्नूजी त्यावेळी फार घाबरले होते. मनातील ही भावना त्यांनी स्मिता पाटील यांना सांगितली. त्यानंतर स्मिता पाटील यांनी डॉ. देशपांडे यांच्याकडून गोळ्या आणून त्या अन्नूजींना दिल्या होत्या. इतकंच नव्हे, तर सहकलाकाराच्या नात्याने त्या अन्नू कपूर यांना सोडण्यासाठी विमानतळावरही गेल्या होत्या. हा अनुभव सांगत अन्नू कपूर यांनी स्मिता पाटील यांनी त्यावेळी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभारही मानले. त्यांनी शेअर केलेला हा अनुभव सुश्राव्य होताच. पण, त्याचा हा अनुभव पाहता प्रेक्षकांना कलाकारांमध्ये असणारं नातं आणि एकमेकांबद्दल वाटणारी काळजीसुद्धा समोर आली. त्यामुळे या किस्स्यातून पुन्हा एकदा स्मिता पाटील यांचं वेगळेपण पाहायला मिळेल.