Amitabh Bachchan : बॉलिवूडमधील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. ते नेहमीच त्यांच्या नवनवीन चित्रपटांसाठी चर्चेत असतात. सध्या अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी 'हाइट' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. बिग बी चित्रपटांव्यतिरिक्त कौन बनेगा करोडपती सीझन 14 हा शो सुद्धा होस्ट करतात. ते अनेकदा त्या शो दरम्यान स्पर्धकांसोबत मस्करी करताना दिसतात. कधी कधी तर ते त्यांच्या आयुष्यातील मनोरंजक खुलासे करतात जे चाहत्यांना ऐकायला आवडते. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्येही असंच काहीसं घडलं. यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बच्चन आडनावाबद्दल खुलासा केला, ते कुठून आले आणि ते त्यांच्या नावासमोर का लावतात. (How did Amitabh get the surname Bachchan The story told by Big B himself Watch Video nz)
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आडनावा संदर्भातील एक किस्सा शेअर करत सांगितले की, बच्चन आडनाव हे त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांची देणगी आहे, ही त्यांच्या विचारसरणीची निर्मिती आहे. बिग बी म्हणाले की, त्यांच्या वडिलांना स्वतःला जातीच्या बंधनातून मुक्त ठेवायचे होते. कवी असल्यामुळे त्यांना बच्चन हे टोपणनाव मिळाले. मला शाळेत प्रवेश मिळाला तेव्हा शिक्षकांनी माझ्या पालकांना माझे आडनाव काय असावे असे विचारले. याच क्षणी माझ्या वडिलांनी ठरवले की माझे आडनाव बच्चन असेल आणि मी बच्चन होण्याचे पहिले उदाहरण बनलो.
कौन बनेगा करोडपती सीझन 14 या शो मध्ये गुरुग्राममधील स्पर्धक आली होती. तिचे नाव रुची असून तिनं कधीच आडनावाचा वापर केला नाही. रुचीचे आडनाव न वापरण्याचे कारण जाणून बिग बी खूप प्रभावित झाले, त्यामुळे त्यांनी तो किस्सा शेअर केला. अमिताभ बच्चन रुचीला विचारतात की ती तिचे आडनाव का वापरत नाही. यावर स्पर्धकाने उत्तर दिले, मला वाटते आडनाव तुम्हाला जातीच्या बंधनात अडकवते. मला विश्वास आहे की माझे पहिले नाव मला ओळख निर्माण करण्यासाठी पुरेसे आहे. माझ्याप्रमाणे माझे पती देखील आडनाव वापरत नाहीत. लहानपणापासून मला फक्त रुची या नावाने ओळखले जाते आणि कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर मी फक्त रुची आहे.