'ही' अभिनेत्री देखील होती नैराश्याने ग्रस्त...

नैराश्य म्हणजेच डिप्रेशन हा सध्याच्या काळात प्रामुख्याने आढळून येणारा गंभीर आजार. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 19, 2017, 10:15 AM IST
'ही' अभिनेत्री देखील होती नैराश्याने ग्रस्त...   title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई :  नैराश्य म्हणजेच डिप्रेशन हा सध्याच्या काळात प्रामुख्याने आढळून येणारा गंभीर आजार. आपल्या बदलेल्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा नैराश्य आपल्याला ग्रासून टाकते. ग्लॅमर जगाताशी या शब्दाचा अगदी जवळचा संबंध आहे. दीपिका पदुकोण, करण जोहर, शाहरुख खान, अनुष्का शर्मा, टायगर श्रॉफ, मनिषा कोयरा असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी नैराश्याने ग्रासलेले होते. या लांबलचक यादीत अजून एक नाव समाविष्ट झालंय ते म्हणजे अभिनेत्री इलियाना डिक्रूझ.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये यशस्वी ठरलेल्या इलियानाने बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केलं. मात्र, एकेकाळी तिने स्वत:चा आत्मविश्वासच गमावलेला. एका जिन्स ब्रँडसाठी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये इलियानाने याबद्दल सांगितले. जवळपास १५ वर्षांपर्यंत आपण बॉडी डिसमॉर्फिक डिसॉर्डरशी (body dysmorphic disorder) सामना करत असल्याचं तिने स्पष्ट केलं.

स्वत:बद्दल आत्मविश्वास राहिला नसून सतत इतरांनी मला पसंत करावं किंवा माझी स्तुती करावी असं मला वाटायचं.  पुढे ती म्हणते, "किशोरवयात असताना मी फार लाजाळू होते. मी सुंदर दिसत नाही असा न्यूनगंड मला होता. मी १५ वर्षांची असताना हे सर्व सुरु झालं आणि तीन वर्षांपूर्वी मला नैराश्याने पूर्णपणे ग्रासले होते. मात्र जेव्हा आपण एखाद्या गोष्ट स्विकारतो तेव्हा त्यातून मार्ग काढणं सोपं होतं. आपल्याला नैराश्याने ग्रासले आहे हे स्विकारणे हाच त्यावरील पहिला उपाय आहे."
नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवणं आणि गोष्टी स्विकारणं हे महत्त्वाचं असतं हा संदेशही तिने या व्हिडिओतून दिला आहे.