Javed Akhtar Defamation Case: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये जावेद अख्तर यांच्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी मुंबई न्यायालयाने अभिनेत्रीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यापूर्वी शेवटची संधी दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, जावेद अख्तर यांच्या मानहानीच्या खटल्याचे निराकरण करण्यासाठी एक सत्र आयोजित करण्यात आले होते. मात्र, त्यात कंगना आली नाही. यावेळी कंगनाच्या वतीने वकील रिझवान सिद्दीकी यांनी वांद्रे न्यायालयात सांगितले की, काही संसदीय कामांमुळे ती या सत्रात उपस्थित राहू शकणार नाही. त्यानंतर जावेद अख्तर यांचे वकील जेके भारद्वाज यांनी अभिनेत्रीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटसाठी अर्ज दाखल केला.
कंगना रणौतला शेवटची संधी
जावेद अख्तर यांच्या वकिलांनी सांगितले की, कंगना रणौत 40 न्यायालयीन तारखांना उपस्थित राहिली नाहीये. तसेच कंगना जाणूनबुजून खटल्याला उशीर करत असल्याचा देखील त्यांनी आरोप केला होता. ती न्यायालयाचा अवमान करत असल्याचं वकिलांनी सांगितलं. कोर्टाने कंगनाच्या वकिलांना अभिनेत्रीचे उत्तर न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता दंडाधिकाऱ्यांनी कंगना रणौतला पुढील कारवाई करण्यापूर्वी ही शेवटची संधी दिलेली आहे. ती जर पुन्हा न्यायालयात उपस्थित राहिली नाही तर तिच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. त्यासोबतच अजामीनपात्र वॉरंट देखील असू शकते असं म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
2020 मधील कंगना रणौत आणि जावेद अख्तर यांचे हे प्रकरण आहे. ज्यामध्ये एका मुलाखतीत कंगना रणौतने म्हटले होते की, जावेद अख्तर यांनी ह्रतिक रोशनकडून माफी मागितली होती आणि इतरही अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. या मुलाखतीनंतर जावेद अख्तर यांनी अभिनेत्रीच्या दाव्यांवर आक्षेप घेत तिच्या विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.
सध्या अभिनेत्री कंगना रणौत तिच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील कंगना रणौतचा अभिनय उत्कृष्ट असल्याचे वर्णन करण्यात आले. विशेष म्हणजे या चित्रपटात कंगनाने केवळ इंदिरा गांधींची भूमिका साकारली नाही तर ती चित्रपटाची दिग्दर्शिका आणि निर्माती देखील होती.